महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ११ एप्रिलला होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा वर्षभरानंतर होत असल्याने ‘चालू घडामोडी’ या महत्त्वाच्या विषयाचा कालावधी कुठला राहणार, या संदर्भात परीक्षार्थींमध्ये संभ्रम आहे. या संदर्भात आयोगाला विचारणा केली असता त्यांनीही माहिती देण्यास नकार दिला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर असला तरी आयोगाकडून विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित केला जातो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडी’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. याआधारे विद्यार्थी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारखेचा अंदाज घेऊन करीत असतात. मात्र २०२० ची स्थगित परीक्षा आत्ता होणार असल्याने ‘चालू घडामोडी’ कोणत्या ग्राह््य धरायच्या, हा विद्यार्थ्यांपुढे प्रश्न आहे.

विशेष म्हणजे, ‘एमपीएससी’च्या पूर्वपरीक्षा आणि अभियांत्रिकी परीक्षेत मार्च २०२० पर्यंतच्या ‘चालू घडामोडी’ विचारण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आधीच तयार केल्या असल्याने तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनाही अपेक्षित होता. मात्र, संयुक्त पूर्वपरीक्षेचे पेपर नव्याने तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय संयुक्त परीक्षा ही मे २०२० नंतर ऑक्टोबरमध्ये होणार होती. त्या वेळी ऐन तोंडावर आलेली परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे आता ११ एप्रिलला परीक्षा घेताना ‘चालू घडामोडी’चा कालावधी मार्च २०२०, ऑक्टोबर २०२० की मार्च २०२१ राहणार, या संदर्भात संभ्रमावस्था आहे.

तिढा काय?

११ मे २०२० ची स्थगित झालेली दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा वर्षभरानंतर ११ एप्रिलला होणार आहे. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये वर्षभराचा कालावधी लोटून गेल्याने ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार,असा प्रश्न परीक्षार्थींसमोर आहे.