17 January 2019

News Flash

उत्तर नागपुरात काँग्रेसला पर्याय

विशेष म्हणजे गत विधानसभा निवडणुकीत राऊत यांच्यापेक्षा गजभिये यांनी अधिक मते घेतली होती हे येथे उल्लेखनीय.

किशोर गजभिये यांचा काँग्रेस प्रवेश

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासोबतच आणखी एक पर्याय पक्षाला उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे गत विधानसभा निवडणुकीत राऊत यांच्यापेक्षा गजभिये यांनी अधिक मते घेतली होती हे येथे उल्लेखनीय.

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. किशोर गजभिये यांच्या  काँग्रेस प्रवेशामुळे उत्तर नागपुरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती राहिलेले गजभिये यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आहे. सनदी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गजभिये यांची राजकारणातील कारकीर्द सुरू झाली. प्रथम पदवीधर मतदारसंघ आणि त्यानंतर बसपाकडून लढलेली २०१४ ची निवडणूक त्यांनी लढवली व दोन्ही वेळी त्यांनी घेतलेली मते लक्षवेधी आणि प्रस्थापित पक्षांना  धक्का देणारी होती. पदवीधर मतदार संघातील निवडणुकीनंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते उत्तर नागपूर मतदारसंघात बसपाचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. काँग्रेसचे नितीन राऊत हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. गजभिये यांचा १३००० मतांनी भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी पराभव केला होता. गजभिये यांनी घेतलेल्या मतांमुळे राऊत यांना फटका बसला होता. त्यापूर्वी झालेल्या नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे अनिल सोले आणि काँग्रेसचे प्राचार्य बबनराव तायवाडे यांना त्यांनी कडवी झुंज दिली होती. गजभिये यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. ते अपक्ष लढले होते, पण त्यांना बसपाचे समर्थन होते. त्यांना १९, ४५५ मते मिळाली होती.

दरम्यान बसपामधून सुरेश माने बाहेर पडल्यावर त्यांच्यासोबत किशोर गजभिये यांनी देखील पक्ष सोडला.  परंतु राज्यातील राजकीय स्थिती बघता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर नागपूर या राखीव मतदारसंघात नितीन राऊत यांच्यासोबतच पक्षाला गजभियेंच्या निमित्ताने सक्षम पर्यायी उमेदवार मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राऊत हे प्रदेश काँग्रेस आणि शहर काँग्रेसमध्येही एकाकी पडले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून त्यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी मतभेद झाले तर शहर काँग्रेसमधील गटबाजीत ते माजी खासदार मुत्तेमवार गटाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. दुसरे मुत्तेमवार विरोधक सतीश चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसने बजावलेल्या नोटीसवरून वाद सुरू आहे. या मुद्यांवरून परस्परांवर आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहे. या वादात राऊत यांची भूमिका ही चतुर्वेदी समर्थकांची आहे. राऊत यांनी विदर्भासाठी स्वतंत्र प्रदेश काँग्रेस स्थापन करावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. हा एकप्रकारे प्रदेश काँग्रेसला दिलेला इशाराच होता. या सर्व पाश्र्वभूमीवर गजभिये यांचा काँग्रेस प्रवेश उत्तर नागपूरच्या म्हणजे राऊत यांच्या मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकते.

First Published on February 10, 2018 12:29 am

Web Title: congres get face in north nagpur kishore gajbhiye