काँग्रेसचा निर्धार
गेल्या वर्षी मोर्चा फसल्याने काँग्रेसने धसका घेतला असून यावेळचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोर्चाच्या तयारीत कोणतीही कसूर राहू नये म्हणून पुढील महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा विषय तूर्त बाजूला ठेवून संपूर्ण लक्ष मोर्चाच्या तयारीवर केंद्रित केले आहे. ‘आधी मोर्चा, नंतर निवडणूक’ अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा अशोक चव्हाण यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्याशी विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राजेंद्र मुळक यांच्या नावावर चर्चा केली, परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.
सलग १५ वर्षे सत्ता भोगल्यानंतर काँग्रेसने गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी विधान भवनावर मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काही मोजक्या आमदारांच्या भरवशावर पाच ते सात हजार लोक मोर्चात सहभागी होऊ शकले होते. त्यावरून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. दीड दशक सत्तेत राहिल्याने पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होणे आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारीत डावलण्यात आल्याची तीव्र भावना त्यावेळी होती. त्याचे पडसाद मोर्चात स्पष्ट दिसून आले.
फडणवीस सरकारने राज्यकारभार हाती घेऊन जेमतेम काही दिवस झाले होते. काम करण्याची संधी न देताच सरकारविरोधी भूमिका घेणे कार्यकर्त्यांना सहज जमले नव्हते. गेल्या वर्षभरात बरेच पाणी ‘राजकीय पुलाखालून’ वाहून गेले आहे. विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्या, शेतमालास भाव, महागाई, वेगळा विदर्भ आदी मुद्दय़ांवर पोटतिकडीने बोलणाऱ्यांनी सत्तेत आल्यानंतर कपडे बदलावे तशी भूमिका बदली. त्याचा परिणाम जनतेच्या मनावर झाला असून जनतेच्या सरकारविरोधी भावनेला फुंकर घालण्याचे काम विरोधी पक्षाला करण्याची संधी मिळाली आहे.
काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलून पक्ष पातळीवर मरगळ झटकण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी काँग्रेसला राज्यात राजकारणात पुन्हा परतण्याचा विश्वास प्रदान केला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीनेदेखील काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी मोर्चा यशस्वी होणे गरजेचे आहे. हे ओळखून चव्हाण यांनी आर्थिक सबळतेवर निकालाची दिशा ठरणाऱ्या विधान परिषदेकडे फारसे लक्ष न देता आधी मोर्चा, नंतर निवडणूक, अशी भूमिका घेतली आहे.
चव्हाण बुधवारी दिवसभर उपराजधानीत होते. त्यांनी जिल्ह्य़ातील १२ विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आणि शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि नगरसेवक तसेच नागपूर ग्रामीण काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोर्चासंदर्भात बैठक झाली. यावेळी विदर्भातील ज्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते असे पदाधिकारी आणि नेत्यांशी मोर्चाबाबत चर्चा केली.
चव्हाण यांच्या दिवसभरातील बैठकांमध्ये ८ डिसेंबरचा मोर्चा हा एकच विषय होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोर्चाची माहिती दिली आणि विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल फारसे बोलण्याचे टाळले. यावरून काँग्रेसने गेल्या वर्षीच्या मोर्चातून आलेल्या अनुभवातून सावध होत ‘आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे’ या उक्ती प्रमाणे ‘आधी मोर्चा, नंतर निवडणूक’ असा निर्धार केल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congres preparation for election
First published on: 04-12-2015 at 02:11 IST