महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या असून काँग्रेसचे पदाधिकारी पूर्व नागपुरात या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेची दावेदारी मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर काँग्रेस कार्यकर्ते पूर्व नागपुरात अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.
काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मुसंडी मारली. विधान भवनावरील मोर्चा देखील यशस्वी झाला. यामुळे काँग्रेसला पालिका निवडणुका जिंकण्यास अनुकूल वातावरण असल्याचे जाणवू लागले आहे. पूर्व नागपुरात मात्र यानिमित्ताने वर्चस्वाच्या लढाईला प्रारंभ झाला आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनीही त्यास खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय गेल्या आठवडय़ात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दौऱ्यानिमित्ताने आला. चव्हाण यांनी एकाच मतदारसंघात काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. या मतदारसंघात तेली समाज आणि हिंदी भाषक मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे सतीश चतुर्वेदीनंतर येथे हिंदी भाषक पर्याय शोधण्याचा प्रयत्न होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत येथून तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे अ‍ॅड. अभिजित वंजारी रिंगणात होते. आता उत्तर भारतीय सभेच्या माध्यमातून सक्रिय झालेले उमाकांत अग्निहोत्री सक्रिय झाले आहेत. मात्र अ‍ॅड. वंजारीही आजी-माजी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तंबू ठोकून आहेत. सध्या विधानसभा निवडणुका लांब असल्या तरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे. याच भावनेतून अग्निहोत्रीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावली. दहा वर्षांपासून पूर्व नागपुरात काँग्रेसचा आमदार नाही. काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांनी ते मंत्री असतानाच्या काळात पूर्व नागपूरचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र, तरीही त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानतंर त्यांचा या मतदारसंघाशी संपर्क तुटला. २०१४ मध्ये ऐनवेळेवर वंजारी लढले त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. दरम्यान, काळात संजय निरुपम यांच्या माध्यमातून अग्निहोत्री सक्रिय झाले. काँग्रेसला पूर्वीप्रमाणे मजबूत करण्याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचा त्यांचा दावा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने कार्यकर्त्यांच्या जनसंपर्कात आहे. भाजपकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. नवीन काम या सरकारने पूर्व नागपुरात केलेले नाही, यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमांना लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. याचा परिणाम महापालिका निवडणुकीत निश्चित दिसून येणार आहे.