चंद्रशेखर बोबडे

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला. पण यंदा उमेदवार बदलल्याचा फटका बसू नये म्हणून पक्षाने ही लढत गांभीर्याने घेतली. यामुळेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी बैठका व मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

सुमारे पाच दशकांपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. नितीन गडकरी यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. एकदा तर त्यांची बिनविरोध निवड येथून झाली होती. यावरून भाजपचा या मतदारसंघातील दबदबा दिसून येतो. यावेळी भाजपने माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्याऐवजी फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सुरुवातीला पक्षातच थोडे नाराजीचे सूर उमटले होते. ही धोक्याची घंटा ठरू शकते म्हणून फडणवीस यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली. गेल्या आठवडय़ात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ते नागपुरात तळ ठोकून होते. या काळात त्यांनी शहरातील सहाही मतदारसंघांत मेळावे, सभा घेतल्या. पदवीधरांचे विविध घटक उदा. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, सीए, डॉक्टर्स आणि इतरही घटकांच्या बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांना कामाला लावले.

पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जशी तयारी केली जाते तशी तयारी फडणवीस यांनी नागपूरच्या जागेसाठी केली आहे. यावरून त्यांनी ही जागा भाजप आणि फडणवीस यांनी किती प्रतिष्ठेची केली हे दिसून येते.

यापूर्वी भाजपने या मतदारसंघात इतकी मेहनत कधीच घेतली नाही. गडकरी निवडणूक लढवत होते. तेव्हा ही ते इतक्या सभा आणि मेळावे कधीच घेत नव्हते. मतदारसंघातील सहा जिल्ह्य़ांत एकदा भेट देत. त्यानंतर त्यांची निवडणूक ही कार्यकर्तेच लढत. भाजपने या मतदारसंघावर त्यांचे केवळ भक्कम संघटनात्मक पाठबळाच्या जोरावरच प्राबल्य प्राप्त केले आहे. मतदार नोंदणीपासून तर नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा भाजपकडे आहे, त्यामुळे यापक्षाला कधीच भपकेबाज प्रचाराची गरज भासली नाही. यावेळी मात्र असे वेगळे चित्र दिसत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत.

फडणवीस यांनी जोशी यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. आता उमेदवारी खेचून आणल्यावर ते कुठलाही धोका पत्करायला तयार नाही, उमेदवार बदलण्याचा काहीही परिणाम विजयावर होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.

मतदारसंख्येत घट

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी २ लाख ८८ हजार २२३ मतदार होते. यात १ लाख ९२ हजार ३१९ पुरुष तर ९५ हजार ९० महिला मतदार होत्या. २०२० च्या निवडणुकीत ही संख्या २ लाख ६ हजार ४५४ आहे. सर्वाधिक म्हणचे १ लाख २ हजार ८०९ मतदार नागपूर जिल्ह्य़ातील आहेत. तर सर्वात कमी १२,४४८ गडचिरोली जिल्ह्य़ातील आहेत.

मतदारसंघातील जिल्हे :

१) नागपूर २) चंद्रपूर ३) भंडारा ४) गोंदिया ५) वर्धा ६) गडचिरोली

* सुमारे पाच दशकांपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. नितीन गडकरी यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

* यावेळी भाजपने माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्याऐवजी फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सुरुवातीला पक्षातच थोडे नाराजीचे सूर उमटले होते.

* काँग्रेसने अभिजित वंजारी यांना या मतदारसंघात  उमेदवारी दिली आहे.

* यापूर्वी भाजपने या मतदारसंघात इतकी मेहनत कधीच घेतली नाही. गडकरी निवडणूक लढवत होते. तेव्हा ही ते इतक्या सभा आणि मेळावे कधीच घेत नव्हते. मतदारसंघातील सहा जिल्ह्य़ांत एकदा भेट देत.

देवेंद्र फडणवीस हे आमचे स्थानिक नेते आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आता विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा नागपूरच्या विविध घटकांशी, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी निकटचा संबंध आहे. त्यांच्यावर नागपूरकरांचा विश्वास आहे. त्यांनी दोन दिवस प्रचारासाठी दिल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक वाढला आहे. याचा या निवडणुकीत फायदाच होणार आहे. -गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप