शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्यांवरून सरकारला जाब विचारण्यासाठी एकजूट झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

विरोधकांमधील दुहीचा फायदा घेत आतापर्यंत सत्ताधारी नागपूर अधिवेशन काळात त्यांच्यावर मात करीत आले. विधान परिषदेच्या निवडणुकीतही मते फुटली होती. पवार नेतृत्व करणार म्हणून स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचा परिणाम या संयुक्त मोर्चावर होईल, असे भाकित वर्तवण्यात येत होते. मात्र आजच्या मोर्चाला उसळलेल्या गर्दीमुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना दिलासा मिळाला.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, आरपीआय (कवाडे), आरपीआय (गवई) आणि माकप आदी पक्षांचा एकत्रित मोर्चा विधानभवनावर आज धडकला. या मोर्चासाठी सुमारे ४० ते ६० हजार लोक संपूर्ण राज्यातून आल्याने शहर दणाणले. जुने मॉरिस कॉलेज टी-पाईटवर आयोजित मोर्चातील सहभागी लोक उड्डाण पूल आणि सीताबर्डी परिसरात मोठय़ा संख्येने होते. तत्पूर्वी काँग्रेसने दीक्षाभूमी येथून तर राष्ट्रवादीने धनवटे नॅशनल कॉलेज येथून मोर्चाला प्रारंभ केला. शरद पवार आणि गुलामनबी आझाद थेट मोर्चाच्या स्थळी पोहचले. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, उपनेते विजय वडेट्टीवार पीरिपा प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे, सपाचे अबु आझमी, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी मंत्री राजेंद्र मुळक तसेच इतर नेते उपस्थित होते.

पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा  अपमान -आझाद

मोदी यांनी हमीभाव आणि त्यावर पन्नास टक्के नफा देण्याचे आश्वासन देऊन ते पाळले नाही, हा शेतकऱ्यांचा, देशाचा अपमान आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी मोदीवर केला. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुफळी माजवू शकत नाही. जनतेची वारंवार दिशाभूल केली जाऊ शकत नाही. माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी लष्कर प्रमुखांवर आपले पंतप्रधान आरोप करतात. पंतप्रधानांची एवढी पातळी खाली कधीच गेली नाही, असे आरोप करताना लाज वाटायला हवी, अशी टीका करतानाच हे लोक निवडणूक जिंकण्यासाठी दंगली घडवून आणू शकतात. त्यामुळे जनतेने सावध राहावे, असे आवाहनही केले.

कर्जमाफी म्हणजे ठिंबक सिंचन -अशोक चव्हाण

सरकार ३४ हजार कोटींचे कर्जमाफ केल्याचे सांगते. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. ही कर्जमाफी म्हणजे ठिंबक सिंचन योजना आहे, अशी खिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेची उडवली. ‘मन की बात’ आणि ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमामधून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री खोट बोलत आहे. खोटे बोल पण रेटून बोल असा या सरकाराचा अजेंडा आहे. या सरकारकडून लाभार्थ्यांच्याही खोटय़ा जाहिराती दिल्या जात आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हेच केवळ सरकारचे लाभार्थी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे पाप कोणाचे -मुंडे

भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या शेतकरी आत्महत्या हे कोणाचे पाप आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हे काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला मुंडेंनी प्रतिउत्तर दिले. फडणवीस हे शेतकरी पुत्र असल्याचे सांगतात. मात्र त्यांना शेतीतील काही कळत नाही, शेतकरी पुत्र असाल तर त्यांनी गायीची धार काढून दाखवावी, असे आव्हान दिले. महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे लग्न सत्तेशी लावून दिले. परंतु तीन वर्षे झाली तरी जनकल्याणाचे पोरं होत नाही. यात काय आमचा दोष आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

क्षणचित्रे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता. सभास्थळी त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाबनबी आझाद यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यवतमाळ ते नागपूर अशी १५४ किलो मीटरचा पायी प्रवास करून शेतक ऱ्यांच्या प्रश्नावर दिंडी काढल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचा काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोर्चाला मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकं उभी होती. मात्र उड्डाण पूल रिकामा असल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकत्यार्ंना तेथे जाऊन बसा, असे आवाहन केले.

रहाटे कॉलनी चौक ते टी पॉईंट चौक दरम्यान मोर्चा आणि सभास्थळी भाषणे ऐकायला आणि बघायला मिळावी यासाठी मार्गावर अनेक ठिकाणी एलसीडी लावण्यात आले होते.

जनता चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा येताच काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी केली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.