पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणा

नागपूर : पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढवले जात असल्याने काँग्रेसने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवास स्थानासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि गडकरी यांचे मुखवटे घालून ‘भीक मांगो’ आंदोलन केले.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करीत आहे, असा आरोप करीत महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव नितीन कुंभलकर यांच्या नेतृत्वात गडकरी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय दुबे, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजा करवाडे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुखवटे, वाहनाला दे धक्का अन् बांगडय़ा

या आंदोलनात एनएसयूआयने मुखवटे घालून प्रतिकात्मक भीक मागितली. युवक काँग्रेसने बंद चारचाकी वाहनाला खेचून नेण्याचा प्रयत्न केला. महिला काँग्रेसने बांगडय़ा दाखवून केंद्र सरकार आणि मंत्र्यांचा निषेध केला.