उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ

राजेश्वर ठाकरे, नागपूर</strong>

अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने काठावर विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी भाजप ही जागा साबूत ठेवणार की काँग्रेस परत मिळवणार याकडे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार व या भागाचे तीनवेळा प्रतिनिधित्व करणारे डॉ. नितीन राऊत यांचा पराभव करून भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रथमच प्रवेश केला होता. बसपाचे किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मते घेतली होती व  राऊत हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी गजभिये काँग्रेसमध्ये आहेत आणि उत्तर नागपूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र,त्यांना लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून उमेदवारी दिल्याने पक्ष त्यांना पुन्हा संधी देईल का, याबाबत साशंकता आहे. डॉ. नितीन राऊत हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार आहेत. पक्षाचे अनुसूचित जाती शाखेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष असलेले राऊत यांची दिल्ली दरबारी जवळीक आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज भरण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, मतदारसंघातील काही नगरसेवकांचाही त्यांना असलेला विरोध त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकते.

पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यास ते पुत्र कुणाल राऊत यांचे नाव समोर करू शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आठ हजारांवर मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे काँग्रेसची आशा वाढली आहे. परिणामी, काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्याही वाढली आहे. काही नगरसेवक उमेदवारी मिळावी म्हणून सक्रिय झाले आहेत. नगरसेवक मनोज सांगोळे आणि संदीप सहारे यांनी उमेदवारी मागितली आहे.

दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांच्याबाबत पक्षात आणि मतदारांमध्येही नाराजी आहे. पाच वर्षांत ते आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवू शकले नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला, असे भाजपला वाटते. त्यामुळे यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींचा दिसत आहे.अनुसूचित आघाडीचे अध्यक्ष अशोक मेंढे आणि माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक संदीप जाधव यांची नावे चर्चेत आहेत.

या मतदारसंघात बसपा फॅक्टर प्रभावी असला तरी लोकसभा निवडणुकीत तो विशेषत्वाने दिसून आला नाही. दलितोत्तर मतांची मोठी संख्या निर्णायक ठरणारी आहे. वंचित बहुजन विकास आघाडीची ही ताकद या भागात आहे. हे दोन्ही पक्ष कोणाला उमेदवारी देतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून असेल.

विधानसभा – २०१४ (मिळालेली मते)

डॉ. मिलिंद माने – ६८, ९०४

किशोर गजभिये – ५५,१८७

नितीन राऊत – ५०,०४२

लोकसभा – २०१९ (मिळालेली मते)

नितीन गडकरी (भाजप) – ८७, ७८१

नाना पटोले (काँग्रेस) – ९६,६९१