काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे नेते रस्त्यावर; चार शहर बस फोडल्या; नागपूर बंदला प्रतिसाद

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यासह विविध विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला नागपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या आंदोलनादरम्यान चार शहर बस फोडण्यात आल्याने शांतीपूर्ण आंदोलनाला गालबोट लागले.

शहर काँग्रेसने रामनगर चौकातून गोकुळपेठ बाजारपेठ मार्गे धरमपेठ आणि शंकर चौक होत सक्करदरा, महाल, सदर आदी भागात रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि सचिव आशीष दुवा, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत, शहराध्यक्ष विकास ठाकरे सहभागी झाले होते.  मुकुल वासनिक शंकरनगर चौकापर्यंत रॅलीत होते. नंतर ते जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाडीला गेले. बंदसाठी शहर काँग्रेसने १८ चमू तयार केल्या होत्या. त्या सहा विधानसभा मतदारसंघातील आंदोलनात सहभागी होत्या. या चमूची भेट घेत काँग्रेस नेत्यांची रॅली पुढे जात होती. काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे, डॉ. प्रशांत बनकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्व नागपुरातील व्यंकटेश सिटीपासून जगनाडे चौकपर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर या चौकात धरणे देण्यात आली. अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात पूर्व नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढण्यात आली.

शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने बंद होती. काही भागातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. आंदोलकांनी शंकरनगर चौक, हिंगणा रोड, उमरेड रोड आणि वर्धमाननगर आदी ठिकाणी शहर बसच्या काचा फोडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांचा आंदोलनात सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सक्करदरा, महाल, इतवारी भागातून दुचाकीवरून रॅली काढली. मनसेने लक्ष्मीभवन चौकात निदर्शने केली. त्यांनी अनेक दुकाने  बंद पाडली. आरपीआयने संविधान चौकात इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली.

दरम्यान, पोळ्याच्या पाडव्याला नागपुरात मारबत, बडग्यांची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे इतवारी, महाल, जागनाथ बुधवारी परिसरात लोकांची गर्दी दिसून आली. राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस दुपापर्यंत बंद होत्या. शहर बस आणि ऑटोरिक्षा देखील बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी पाडव्याला सुटी जाहीर केल्याने शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये बंद होती. रेल्वे वाहतूक सुरू होती.

दरवाढीवर भाजप गप्प का -ठाकरे

पेट्रोल  ८८ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ७४ रुपयांहून अधिक झाले आहेत. स्वयंपाकाचा गॅस प्रतिसिलिंडर ८०० रुपयांवर पोहोचला आहे. २०१४ मध्ये पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपकाच्या गॅसच्या किंमती अध्र्यावर होत्या, त्यावेळेस भाजपचे नेते आंदोलन करीत होते. आता  हेच लोक आता सरकारचे यावर नियंत्रण नाही, असे सांगून  जनतेचा विश्वासघात करू लागले आहेत, अशी टीका शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली.

मतभेद विसरून नेते एकत्र

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत बंदची हाक दिल्याने शहरातील काँग्रेस नेत्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय उरला नाही. याची प्रचिती आज भारत बंद दरम्यान काँग्रेसने  काढलेल्या रॅलीदरम्यान आली. एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी न सोडणारे नेते थोडावेळ का होईना एकत्र आले होते. माजी मंत्री नितीन राऊत, खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, के.के. पांडे  या रॅलीत माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत चालत होते.

जिल्ह्य़ातही बंद

भारत बंदचा परिणाम नागपूर जिल्ह्य़ातही जाणवला. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्ह्य़ातील वाडी, बुटीबोरी, उमरेड, भिवापूर, कुही, कामठी, सावनेर, रामटेक, हिंगणा, काटोल, नरखेड येथे मोदी सरकारविरोधात बंद पाळला. या आंदोलनात आमदार सुनील केदार, एस.क्यू. जामा, सुरेश भोयर, संजय मेश्राम सहभागी झाले होते.