X

प्रतीकात्मक बडग्यांची जंगी मिरवणूक

राम कदम, नीरव मोदी, महागाई विरोधातील बडगे

राम कदम, नीरव मोदी, महागाई विरोधातील बडगे; ऐतिहासिक मारबत मिरवणूक पाहण्यासाठी झुंबड

महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार राम कदम, पीएनबी घोटाळा करणारे नीरव मोदी, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली खोटी आश्वासने, महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे नेते, हलबांना न्याय न देणारे सरकार,  एसएनडीएल,ओसीडब्ल्यू हटाव, सिलिंडर, पेट्रोल, डिझेलची दरवाढ आदी सरकारवर टीका करणारे आणि समाजातील विविध अनिष्ट प्रश्नांवर  व्यंग करणारे प्रतीकात्मक बडग्यांची जंगी मिरवणूक यंदा आकर्षणाचे केंद्र ठरली.

राम कदम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करणारे बडगे हे यावर्षीचे खास आकर्षण होते. मिरवणुकीत यावर्षी छोटे-मोठे १४ बडगे आणि ५ मारबती सहभागी झाल्या होत्या.

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरेची जपणूक करीत गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने मारबत मिरवणूक काढण्यात येते. आज सकाळी साडेदहा वाजतापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. ती पाहण्यासाठी रस्त्यावर लोक जमू लागले. डीजे आणि ढोल-ताशांच्या निनादात वेगवेगळ्या भागातून बडगे काढण्यात आले.  मिरवणूक पाहण्यासाठी मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल शिवाजी पुतळा या भागात लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. डीजे आणि ढोल- ताशांच्या निनादावर तरुणाई बेधूंद नाचत होती.

बडग्यांच्या माध्यमातून संताप

लालगंज भागातील संग्राम बडग्या उत्सव मंडळाने भाजप नेते व आमदार राम कदम यांचा बडग्या तयार केला होता. सार्वजानिक बडग्या उत्सव मंडळाने बांगलादेशी लोकांना शरण देणाऱ्या नेत्यांचा, बाल बडग्या उत्सव मंडळाने एसएनडीएल आणि ओसीडब्ल्यूचा बडगा तयार केला होता. युवा शक्ती बडग्या मंडळाने सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा बडग्या तयार केला होता. आदिम संघटनेने ‘भाजप भगाओ देश बचाओ’ चा बडग्या तर मंगळवारीतील सार्वजानिक बडग्या मंडळाच्यावतीने धार्मिक स्थळ हटवणाऱ्या महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचा निषेध करणारा बडग्या तयार केला होता. महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करणारा बडगा आकर्षक ठरला.

भुरी मारबत

आतापर्यंत काळी, पिवळी मारबत चर्चेचा विषय ठरत होती. यंदा प्रथमच भुरी मारबत काढण्यात आली. महिला पीडित पुरुषांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जेन्डर इक्वालिटी ऑर्गनायझेशन या संस्थेने बडगा तयार केला.

शहीद चौकात जल्लोष

तत्पूर्वी सकाळी तऱ्हाने तेली समाजातर्फे पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमेटीतर्फे काळ्या मारबतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.  दोन्ही मारबती एकाचवेळी निघाल्या आणि शहीद चौकात एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी एकच जल्लोश करण्यात आला. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पिवळी मारबत शहीद चौकात आल्यानंतर परिसर ढोल-ताशांच्या निनादात दुमदुमून गेला होता. मिरवणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर सकाळी १० वाजतापासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.