चंद्रशेखर बोबडे

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात यंदा काँग्रेससह इतरही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने यावेळी होणारी निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१ डिसेंबर रोजी या मतदारसंघात मतदान होत आहे. नागपूरसह सहा जिल्ह्य़ांतील पदवीधर या निवडणुकीचे मतदार असले तरी निर्णायक भूमिका नागपूर जिल्ह्य़ातील मतदार बजावत असल्याचे आजवर झालेल्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग पाच वेळा  येथून विजयी झाले. २०१४ मध्ये गडकरी केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्या जागी भाजपने प्रा.अनिल सोले यांना उमेदवारी दिली व त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत (भाजप-काँग्रेस-बसपा) सोले विजयी झाले होते. यावेळी प्रा.सोले यांच्यासह विद्यमान महापौर संदीप जोशी यांचे नावही भाजपचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. संदीप जोशी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून जोशी यांची ओळख आहे. सलग चार वेळा नगरसेवक आणि आता महापौर म्हणून कारकीर्द त्यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे प्रा.सोले यांना दुसऱ्यांदा आमदारकीचे वेध लागले आहेत. पक्षाचे निष्ठावान म्हणूनही त्यांची ओळख असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशीर्वादही त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सोले की जोशी हा सध्या भाजपमध्ये चर्चेचा विषय आहे.

दुसरीकडे काँग्रेसने पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहे. पक्षाचे नेते व शिक्षण संस्था चालक अभिजित वंजारी यांचे नावावर पक्षात विचार सुरू आहे. २००८  पर्यंत काँग्रेसकडून या मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिला जात नव्हता. २०१४ मध्ये प्रथमच काँग्रेसने बबनराव तायवाडे यांना  पक्षाची उमेदवारी दिली. मात्र ते पराभूत झाले. याच वर्षी प्रथमच बसपाने या निवडणुकीत उडी घेतली होती. पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पहिल्याच प्रयत्नात १९,४५५ मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेसची पारंपरिक मते गजभियेंकडे वळल्याने भाजपचा विजय सोपा झाला होता. सध्या किशोर गजभिये काँग्रेसमध्ये आहे आणि बसपाने ही निवडणूक लढवायची किंवा नाही हे स्पष्ट केले नाही. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि काही सिनेट सदस्यही रिंगणात राहणार आहे. जितके जास्त उमेदवार तितका भाजपचा फायदा असे समीकरण या निवडणुकीत असते.

नोंदणीला महत्त्व

या मतदारसंघावर भाजपची घट्ट पकड असण्यामागे पक्षाचे संघटनात्मक पाठबळ हे मुख्य कारण आहे. पदवीधरांची नोंदणी हा या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक असून हे काम पक्षाच्या माध्यमातून निरंतर सुरू असते. त्या तुलनेत काँग्रेससह इतर पक्ष निवडणुका जवळ आल्यावर या कामाकडे लक्ष देतात. नोंदणी केलेल्या पदवीधरांची तपशीलवार माहिती घेऊन त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणारी सबळ यंत्रणा भाजपकडे असून इतर पक्षात याचा वानवा आहे. भाजपकडून इतर सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक गांभीर्याने घेतली जाते. पक्षाचे पाठबळ आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रचारात उतरतात. काँग्रेसह इतर पक्षाबाबत असे चित्र दिसून येत नाही. उमेदवारावर निवडणुकीची जबाबदारी टाकली जाते. यंदा थोडे वेगळे चित्र पक्षात आहे. संभाव्य उमेदवार वंजारी यांच्यामागे काँग्रेसचे सर्व गट ठामपणे उभे आहेत. नेत्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी फारपूर्वीपासून तयारी केल्याने याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

भाजप मागील पाच वर्षांत सत्तेत होती व आता केंद्रात सत्तेत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. विद्यापीठात भाजपप्रणीत शिक्षण मंचांचे वर्चस्व आहे, मात्र पक्षांतर्गत गटबाजी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या निवडणुकीत प्रथमच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीचे पाठबळ काँग्रेस उमेदवाराला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्टवादीची साथ मिळाल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते.

आतापर्यंत एकूण नोंदणी १ लाख ८८ हजार २०० झाली आहे.

२०१४ मध्ये झालेले मतदान व प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

एकूण मतदार २ लाख ८७,११८

झालेले मतदान : १ लाख २७६ (३७%)

प्रा.  अनिल सोले (भाजप) : ५२,४८५

प्रा. बबन तायवाडे (काँग्रेस) : ३१,२५९

किशोर गजभिये (बसपा) : १९,४५५