News Flash

तानाजी वनवेच काँग्रेस गटनेते, विरोधी पक्षनेतेपदी निवड योग्य

महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली.

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

उच्च न्यायालयाचा निर्वाळा; संजय महाकाळकरांची याचिका फेटाळली 

महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या गटबाजी नाटय़ावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर गुरुवारी पडदा पडला. तानाजी वनवे यांची गटनेते व विरोधी पक्षनेतेपदी झालेली निवड योग्य ठरवून संजय महाकाळकर यांची याचिका फेटाळली. या आदेशामुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाला जबर धक्का बसला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. मात्र, पक्षातील दुसऱ्या गटाने त्यांच्या विरोधात बंड करीत तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली. हा वाद विभागीय आयुक्ताकडे गेला. काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांचे वनवे यांना समर्थन असल्याने आयुक्तांनी १९ मे रोजी वनवे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली. महाकाळकर यांनी आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर अवकाशकालीन न्या. अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर प्रकरण न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणीला आले. दरम्यान १ जूनच्या महापालिका आमसभेत महापौर नंदा जिचकार यांनी वनवे यांना विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर केले. या निर्णयालाही महाकाळकर यांनी आव्हान दिले होते. प्रदेश व शहर काँग्रेसने मध्यस्थी अर्ज दाखल करून वनवे यांची नियुक्ती अनधिकृत असल्याचा दावा केला होता तर १५ नगरसेवकांनी वनवे यांच्या बाजूने मध्यस्थी अर्ज दाखल करून वनवे यांच्या निवडीचे समर्थन केले.

असे होते वनवेचे म्हणणे

महापालिकेतील गटनेता व विरोधी पक्षनेता निवडताना संबंधित पक्षाला माहिती देणे आवश्यक असून पक्षाचेही शिफारसपत्र गरजेचे आहे, असे संजय महाकाळकर यांचे म्हणणे खोडून काढत तानाजी वनवे यांनी नागपूर महापालिकेत नागपूर महापालिका भारतीय कॉंग्रेस पक्ष अस नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे गटनेता निवडताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विचारण्याची आवश्यकता नाही तर निवडून आलेल्या नगरसेवकांनी बहुमताने गटनेता व महापालिकेने विरोधी पक्षनेतापदी निवडले. त्यामुळे या पदावर झालेली निवड योग्य असल्याचा दावा तानाजी वनवे यांनी उच्च न्यायालयात केला होता.

उच्च न्यायालयाचे आदेश असे आहे

महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापालिकेतील विविध राजकीय हालचालीकरिता घटना किंवा संविधान असणे आवश्यक आहे. परंतु काँग्रेस पक्षाने अशी घटना सादर केली नाही. त्यामुळे महाकाळकर यांना गटनेतापदावरून हटवण्याची काय प्रक्रिया असावी आणि नवीन गटनेता निवडीची प्रक्रिया काय आहे, हे स्पष्ट नाही. त्यामुळे पक्षाच्या सदस्यांनी बहुमताच्या आधारावर निवडलेला गटनेता योग्य आहे. तसेच याचिकेत महापौरांनी वनवे यांची विरोधी पक्षनेतापदी केलेल्या निवडीसंदर्भात काही ठराविक आक्षेप आले नाहीत. त्यामुळे त्यांची महापौरांचाही निर्णय कायम असून महाकाळकर हे त्यांच्या मुलभूत हक्कांचे हनन झाल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात येत आहे, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

लोकशाहीचा विजय

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. माझ्या बाजूने बहुमत होते. त्याच आधारावर विभागीय आयुक्तांनी गटनेते पदाला मान्यता दिली होती. त्याला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने देखील बहुमताच्या बाजूने निर्णय दिला. त्याचे मी या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयानंतर किशोर जिचकार हे स्वीकृत सदस्य होतील. यामुळे माझ्या बाजूने ३० नगरसेवक होतील.’’

– तानाजी वनवे, विरोधीपक्ष नेते, महापालिका.

सर्वोच्च न्यायालयात जाणार

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ. पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे आणि पक्षाच्याच नगरसेवकांना फोडून गटनेत्याला हटवणे हे योग्य नाही. हा केवळ काँग्रेस पक्षापुरता विषय नाही. सर्वच पक्षासाठी तो लागू आहे. भारतीय लोकशाहीत पक्षीय राजकारणाला महत्त्व आहे. अशाप्रकारे कुणीही ‘शक्ती’चा वापर करून नगरसेवकांना फूस लावतील आणि विभागीय आयुक्तांकडे जातील. यामुळे पक्षीय राजकारणाला काही अर्थच उरणार नाही.

– विकास ठाकरे,शहराध्यक्ष काँग्रेस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:14 am

Web Title: congress corporator tanaji vanve appointment as leader of oppn in nmc
Next Stories
1 रेल्वे अपघातास मनुष्यबळाची कमतरता जबाबदार
2 रस्ते नाहीच, फक्त खड्डेच खड्डे
3 विदर्भातील ‘बाबा, महाराज’!
Just Now!
X