नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या निर्णयाबाबत आयुक्त तुकाराम मुंढे त्या त्या प्रभागातील कुठल्याही पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी  पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

ज्या ठिकाणी एकही करोनाबाधित नाही असे अनेक भाग गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.  काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांनी रामनगर व पार्वतीनगरात परिसर मोकळा करण्यात यावा, अशी मागणी करीत आंदोलन केले. त्यांनी मुंढे यांच्याशी संपर्क केला मात्र ते फोन उचलत नसून गेल्या दोन दिवसात त्यांनी  कुठलाच सकारात्मक  प्रतिसाद दिला नाही. याशिवाय विलगीकरणातील नागरिकांच्या समस्यांबाबत काँग्रेसचे अनेक नगरसेवक त्यांच्याशी संपर्क साधतात पण त्यांनाही प्रतिसाद देत नसल्यामुळे नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात पालकमंत्री  नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे मुंढे यांच्या विरोधात तक्रार केली. यापूर्वीही आमदार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या संदर्भास काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, संदीप सहारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मुंढे  चांगले निर्णय घेत असले तरी त्यांनी नागरिकांचा विचार करण्याची गरज आहे. केवळ मी म्हणतो तेच खरे अशा पद्धतीने त्यांनी वागणे बरे नाही. लोकप्रतिनिधींना जनतेसमोर जावे लागत असल्यामुळे आम्हाला त्यांना उत्तर द्यावे लागते. विलगीकरणात लोकांना त्रास होतो त्याबाबत  ऐकायला ते तयार नसल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला. प्रफुल गुडधे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.

महापौरांनी निर्णय घ्यावा

काँग्रेसचे नगरसेवक तक्रार करतात. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे त्यांचे फोन उचलत नाही. भेटायला गेले तर बाहेर उभे ठेवतात. प्रभागात फवारणी करण्याबाबत पत्र दिले तर त्याची अंमलबाजवणी केली जात नाही. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार करणार आहे. आयुक्त ऐकत नसतील तर महापौरांनी नगरसेवकांच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घ्यावा.

– तानाजी वनवे,  विरोधी पक्षनेते.

स्थायी समितीच्या बैठकीला मंजुरी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० मे रोजीचा स्थायी समिती प्रस्ताव धुडकावत बैठक रद्द केली होती. पुढे होणाऱ्या बैठकींना मंजुरी मिळेल की नाही अशी चिन्हे असताना आयुक्तांनी नरमाई घेत आता १ जून रोजी होणाऱ्या समितीच्या प्रस्तावित बैठकीला मंजुरी दिली आहे. महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून आयुक्त व सत्ताधाऱ्यामध्ये संघर्ष सुरू असताना त्यांनी २० मे रोजी होणारी स्थायी समितीची बैठक रद्द केली हीती.  त्यानंतर स्थायी समितीने या संदर्भात महापौर संदीप जोशी यांना पत्र दिले होते.