प्रफुल गुडधेंचा घरचा आहेर;  माजी मंत्र्यांवर तोफ डागली

जनता काँग्रेससाठी अनुकूल आहे, काँग्रेसचा पराभव भाजपमुळे नव्हेतर विश्वासार्हता असलेले नेतृत्व नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला. पक्षाने जनतेने नाकारलेल्या नेत्यांना सक्तीच्या निवृत्तीवर पाठवून युवकांना संधी द्यावी, असे नगरसेवक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रफुल गुडधे यांनी कुणाचेही नेत्याचे नाव घेता शहरातील माजी मंत्र्यांवर तोफ डागली.

गुडधे हे काँग्रेसच्या गटनेतेपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु विलासराव मुत्तेमवार गटाचे संजय महाकाळकर यांना हे पद देण्यात आले. पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि विरोधी पक्षनेतेपदाकरिता दुसरा सक्षम दावेदार नसतानादेखील गुडधे यांना हात चोळत बसावे लागले. त्यामुळे त्यांनी जनतेलाच साद घातली आहे. १५१ सदस्यांच्या सभागृहात विरोधी पक्षनेता होता आले नसलेतरी शहरातील तमाम ३० लाख जनतेचा आपण विरोधीपक्ष नेता आहोत. त्यांचा आवाज सभागृहात आणि सभागृहाबाहेर बुलंद करण्याची जबाबदारी स्वीकारतो, असे गुडधे म्हणाले. गटनेतेपदासाठी काँग्रेसच्या २८ नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा होता. काहींनी थेट समर्थन दिले तर काहींनी पक्षश्रेष्ठीवर निर्णय सोडून दिला. परंतु कुणीही माझ्या नावाला विरोध केला नाही. असे असताना जनाधार गमावलेल्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी मला बाजूला करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला. गटनेतेपदासाठी झालेला निर्णय आवडलेला नाही. सत्ताधाऱ्यांना कमकुवत विरोधीपक्ष हवाच असतो. काही मंडळी जाणीवपूर्वक विरोधीपक्षाला कमकुवत करीत आहे. विरोधीपक्ष आपली जागा सोडत आहे, ही लोकशाहीसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. पण मी नागपूरकरांना ग्वाही देतो, विरोधीपक्ष नेतेपद जरी नसलेतरी त्यांचे प्रश्न सातत्याने मांडत राहीन, असेही गुडधे म्हणाले.

शेळके यांचा विजय पथदर्शी

शहरातील बहुसंख्य जनता काँग्रेसला मानणारी आहे. परंतु प्रस्थापित नेत्यांबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केले, तेथे सर्वाधिक मते मिळाली. सज्जन शक्ती गमावलेल्या नेत्यांचे नेतृत्व त्यांना नको आहे. राजकीय, आर्थिक पाठबळ नसताना शेळके यांना मिळालेल्या जनाधाराने दाखवून दिले आहे, असेही प्रफुल गुडधे म्हणाले.