राज्यात सत्ता नाही व विजयाची खात्री नसल्याने काँग्रेसचे नेते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर आता बाहेरचा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत भाजपचे मतदार जास्त आहेत. सहा वर्षांपूर्वी भाजपकडे बहुमत असतानासुद्धा काँग्रेसचे राजेंद्र मुळक निवडून आले होते. तेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता होती. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. या वेळी भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे मुळकही मैदानात उतरण्यास इच्छुक नाहीत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदींनाही विचारण्यात आले, पण कुणीही या पैशाच्या खेळात उतरायला तयार नाही अशी चर्चा आहे. हे लक्षात आल्यावर आता अशोक चव्हाण यांनी बाहेरच्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. येथील दौऱ्यात त्यांनी सहकार क्षेत्रातील नेते प्रमोद मानमोडे यांना विचारणा केली होती. विदर्भात पतसंस्थेचे मोठे जाळे असलेल्या मानमोडेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारीबाबत विचारणा केल्याचे जाहीरच केले. अर्थात, त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. तरी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरूच ठेवली आहे. युती सरकारमधील शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे कट्टर समर्थक, अशी मानमोडेंची ओळख आहे. त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून भाजपची मते फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपकडून दबाव आला, तर मानमोडे रिंगणात उरतणार नाहीत अशी काँग्रेसला भीती आहे. अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक अनंतराव घारड यांचा याच मतदारसंघात पराभव झालेला असल्याने या वेळी पक्षाने बाहेरचा उमेदवार शोधण्याला प्राधान्य दिल्याचे आता बोलले जात आहे.