08 March 2021

News Flash

लोकजागर : काँग्रेसमुक्त उपराजधानी!

पक्ष सत्तेत असून सुद्धा दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, याचे तपशीलवार वर्णन त्यांनी केले.

(संग्रहित छायाचित्र)

काही दिवसांपूर्वी संघटनात्मक बांधणीच्या कामात व्यस्त असलेले भाजपचे एक पदाधिकारी भेटले. पक्ष सत्तेत असून सुद्धा दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, याचे तपशीलवार वर्णन त्यांनी केले. नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात एकूण ८५ हजार कार्यकर्ते पूर्णवेळ कसे गुंतले आहेत, सत्ता आहे तेव्हा निवडून येऊच, अशा अविर्भावात वावरणारा यापैकी एकही कार्यकर्ता नाही. या सर्वाचे शिबीर घ्यायचे ठरवले तरी ते दोन टप्प्यात घ्यावे लागेल इतकी त्यांची संख्या जास्त आहे असेही ते गंमतीने म्हणाले.

या पार्श्वभूमीवर पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेसकडे बघितले तर निराशाच पदरी पडते. हातची सत्ता जाऊन चार वर्षे लोटली. आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले तरी विरोधकाची भूमिका काय असते, हे या पक्षाच्या किमान उपराजधानीतील नेत्यांना तरी उमगलेले नाही. नम्र सत्ताधारी व कणखर विरोधक ही सुदृढ लोकशाहीची लक्षणे समजली जातात. सत्ताधाऱ्यांचे सोडा, पण संधी असूनही या शहरातील विरोधकांना असा कणखरपणा गेल्या चार वर्षांत दाखवता आला नाही. एकीकडे भाजपची अशी तयारी सुरू असताना काँग्रेसमध्ये नेमके काय सुरू आहे, हे बघण्यासाठी साधे डोकावले तरी तीच पूर्वापार चालत आलेली दृश्ये दिसतात. या पक्षाचे पराभूत झालेले नेते आपापल्या संस्थात्मक कामात व्यग्र दिसतात. ज्यांच्याकडे संस्था नाही ते त्यांच्या व्यवसायात रमलेले दिसतात. यापैकी कुणीही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवताना कधी दिसले नाही. या नेत्यांची मुले आतापर्यंत कोषातच होती. आता निवडणुकीची चाहूल लागताच ती पत्रकबाजी करायला बाहेर पडलेली दिसतात. आपल्या पिताश्रींना जनतेने नाकारले आहे तेव्हा ती आपल्याला तरी ती स्वीकारेल का, अशी पुसटशी शंकाही या नेतापुत्रांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वडील उमेदवारी खेचून आणतील, मग लढायचे व पराभूत झाले की पुन्हा घरी बसायचे असाच भाव या पुत्रांच्या चेहऱ्यावर दिसतो.

विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या काही अपेक्षा आहेत का? त्यांना तेच तेच चेहरे हवे की नको? यासारखे साधे प्रश्न या पुत्रांच्या मनाला शिवत सुद्धा नाहीत. असले प्रश्न त्यांच्या वडिलांच्याही मनाला कधी शिवले नव्हते. जनतेवर सत्ता गाजवण्याचा पारंपरिक हक्क आपल्याच पक्षाला मिळाला आहे, याच भ्रमात त्यांची कारकीर्द गेली. त्याला कारण होते सतत मिळणारा विजय! तो काळ आता गेला. आता प्रबळ प्रतिस्पर्धी समोर असल्याचे वास्तव हे नेते व त्यांचे पुत्र स्वीकारायला तयार नाहीत. जनतेने आपल्याला झिडकारले तेव्हा आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे, मुलाऐवजी इतर होतकरू कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असेही या नेत्यांना वाटत नाही.

पक्षाने संधी दिली तर लढू, ही भूमिका हे नेते कायम मांडत असतात. हे सारे बघितल्यावर कार्यकर्त्यांनी तरी या पक्षात कशाला राहायचे, असा विचार केला व तरुणांची मोठी फळीच या पक्षापासून दूर होत गेली. ही घसरण अजूनही सुरूच आहे. भाजपमधील गडकरी, फडणवीस व काही मोजके नेते सोडले तर अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी काँग्रेसची आहे. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार होतात, याचे साधे दु:खही या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कधी व्यक्त केलेले दिसले नाही. गेल्या चार वर्षांत प्रमुख विरोधक असे बिरुद मिरवणाऱ्या काँग्रेसचे दोन मोर्चे येथे निघाले. तेही राज्यव्यापी होते व त्यात उपराजधानीचा सहभाग नगण्य होता.

स्थानिक पातळीवर आमदार सुनील केदार व प्रफुल्ल गुडधे यांनी बेरोजगारांचा व अतुल लोंढे यांनी नागरी प्रश्नावर दिलेले लढे तेवढे लक्षणीय होते. चार वर्षांत चार मोर्चे इतकी सुमार कामगिरी विरोधी पक्षाची असेल तर जनतेने या पक्षाच्या पाठीशी तरी का म्हणून उभे राहायचे? येथील पालिकेत काँग्रेसचे मोजके संख्याबळ आहे, पण तेही गटातटात विभागले गेले आहे. सत्ता नाही याचे भान विसरून हे गट एकमेकांशी प्राणपणाने भांडत असतात.

किमान आता तरी आपण आपसात लढायचे की लोकांसाठी, याचे भान या गटांना व त्यांना संचालित करणाऱ्या नेत्यांना आलेले नाही. सध्या राज्याचे व देशाचे लक्ष उपराजधानीकडे लागलेले असते. कारण सत्तेचे नेतृत्वच येथून सुरू होते. अशा स्थितीत विरोधकांनी थोडा जरी सत्ताविरोधी सूर लावला तर त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. असा सूर लावण्यात हा पक्ष पार अपयशी ठरला आहे. प्रभागात निवडून येण्याची क्षमता नसलेल्या माणसाला शहराचे अध्यक्षपद दिल्यावर यापेक्षा काही वेगळे घडेल याची अपेक्षाच ठेवणे चूक आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर उमटणारा सूर असा असेल तर जनतेच्या पातळीवर स्थिती किती वाईट असेल याची कल्पनाच न केलेली बरी! दुर्दैवाने येथील नेत्यांना व त्यांची पाठराखण करणाऱ्या राज्यातील नेत्यांना या कठीण परिस्थितीचे अजिबात गांभीर्य नाही.

गेल्या चार वर्षांत तरी तसे दिसले नाही. अजूनही हे राज्यातील नेते ज्यांच्याजवळ एकही कार्यकर्ता नाही अशा स्वयंघोषित नेत्यांना घेऊन रणनीती आखत असतात. कारण काय तर प्रतिस्पर्धी गटाचा माणूस वरचढ व्हायला नको. गडकरी, फडणवीस हे केवळ राज्यात नाही तर देशात तगडे नेते म्हणून आता ओळखले जातात. त्यांच्या विरोधात किमान लढत देणारा तरी उमेदवार काँग्रेसकडे आहे का, या प्रश्नाचे उत्तर आजही नाही असेच येते.

या नेत्यांना आव्हान देणारे नाना पटोले येथून लढण्याची भाषा करतात, पण त्यांना विरोध करणारे अनेक नेते या पक्षात सक्रिय आहेत. कुणीही उमेदवार द्या, एकदिलाने काम करू ही भावना हा पक्ष विसरलेला आहे. पराभवानंतर तरी ही भावना पक्षनेत्यांमध्ये पुन्हा जागृत होईल, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. काही काळानंतर भाजपवर जनता नाराज होईल व मग आम्हाला निवडून देईल, हा मुंगेरीलालचा विचार अजूनही या पक्षात पुरेपूर भिनला आहे.

हे चित्र बदलायचे असेल तर काँग्रेसने नव्या रक्ताला वाव देण्याची गरज आहे. गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले, असा प्रश्न भाजपने विचारायचा आणि त्याला उत्तर म्हणून नेत्यांनी त्यांच्या पुत्रांना उमेदवारी मिळवून देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे, असे होत राहिले तर जनता कधीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार नाही. या वास्तवाशी भिडण्याची ताकद आजतरी काँग्रेस नेत्यांमध्ये नाही.

devendra.gawande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:27 am

Web Title: congress free subcapital
Next Stories
1 नागनदी शुद्धीकरणासाठी जपानचे १०६४ कोटी
2 वृक्षकवच अन् संगोपनाअभावी झाडांचा मृत्यू
3 ‘स्क्रब टायफस’चा विळखा आणखी घट्ट!
Just Now!
X