तानाजी वनवे काँग्रेसचे गटनेते, मुत्तेमवार गटाला धक्का

नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते म्हणून तानाजी वनवे यांच्या बाजूने प्रशासनाने कौल दिल्यानंतर गटनेते पदासाठी काँग्रेसमधील वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेसमधील दोन्ही गटांनी बाह्य़ा सरसावल्या असून मुत्तेमवार गटाने हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाण्याचे सुतोवाच केले आहे.

महापालिकेतील स्वीकृत सदस्यासाठी अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दुफळी निर्माण झाली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना नामनियुक्त सदस्य होऊ द्यायचे नाही, असा चंग त्यांच्या विरोधी गटाने बांधून मोर्चेबांधणी केली. काँग्रेसचे महापालिकेत २९ सदस्य आहेत. त्यापैकी १७ नगरसेवकांची मोट बांधण्याचा विरोधी गटाने प्रयत्न केला, परंतु नगरसेवक रमेश पुणेकर हे ऐनवेळी फुटले. विभागीय आयुक्त कार्यालयाने बुधवारी १६ नगरसेवकांची ओळख परेड घेतली आणि तानाजी वनवे यांच्या बाजूने बहुमत असल्याचे सिद्ध झाले, परंतु प्रशासनाने लगेच तानाजी वनवे यांना गटनेते म्हणून घोषित केले नाही. महापालिकेतील स्वीकृत सदस्यांसाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले. काँग्रेसकडून गटनेते संजय महाकाळकर यांच्या स्वाक्षरीने विकास ठाकरे यांनी अर्ज केला आणि तानाजी वनवे यांच्या स्वाक्षरीने किशोर जिचकार यांनी अर्ज दाखल केला. या दोन्ही अर्जासोबत प्रदेश काँग्रेसचे पत्र नव्हते. नामांकन अर्जाची शुक्रवारी छाननी होणार होती, पण ती होऊ शकली नाही. मात्र, विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिका सचिवांनी तानाजी वनवे यांना काँग्रेस गटनेते म्हणून मान्यता देत असल्याचे पत्र दिले. यामुळे गटनेतेपदाचा वाद आणखी चिघळला. मुत्तेमवार यांच्या गटाने आयुक्तांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. उच्च न्यायालयाने सुजाता कोंबाडे विरुद्ध प्रफुल्ल गुडधे प्रकरणात गटनेतेपदासाठी पक्षाचा प्रस्ताव ग्राह्य़ धरला होता.

दरम्यान, चार दिवसांपासून काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवर महापालिकेतील सत्ताधारी भाजप नजर ठेवून आहेत. काँग्रेसमधील वादाचा लाभ घेण्यासाठी एका गटाला चुचकारण्याचेही प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने गटनेतेपदाबाबत दिलेल्या निर्णयाकडेही याच नजरेने पाहिले जात आहे.

दावे प्रतिदावे

राज्य सरकारच्या दबावाखाली प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तानाजी वनवे यांनी ज्या १७ सदस्यांचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले त्यापैकी रमेश पुणेकर हे ओळख परेडमध्ये नव्हते. त्यांना २० मे रोजी बाजू मांडण्यास प्रशासनाने सांगितले आहे. त्याआधीच प्रशासनाने गटनेता बदलण्याचे पत्र जारी केले आहे. माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे विरुद्ध नगरसेवक प्रफुल्ल गुडधे प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव ज्यांच्याकडे असेल, तो गटनेता असा आदेश दिला होता. त्या आधारावर मुत्तेमवार गट उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. दुसऱ्या गटाने आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले. आमच्या बाजूने बहुमत आहे. त्यामुळे महापालिका कायद्यानुसार विभागीय आयुक्तांना गटनेता ठरविण्याचा अधिकार आहे, असा दावा केला.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाने महापालिका सचिव हरीश दुबे यांनी गटनेतेपदाचे पत्र आपल्याला दिले आहे. स्वीकृत सदस्यांसाठी आम्ही अर्ज केला आहे. किशोर जिचकार यांचाच अर्ज अधिकृत ठरेल.

तानाजी वनवे