मंत्रिपदाचा राजीनामा देणार?

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी आणि खार जमीन विकास खाते मिळाल्याने विजय वडेट्टीवार यांची नाराजी तीव्र झाली असून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन असंतोषाला वाट मोकळी करून देण्याच्या तयारीत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला कॅबिनेट मंत्री म्हणून वडेट्टीवार यांनी दांडी मारून आपल्या नाराजीचे संकेत पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होत आहे. त्यावेळी ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षाने त्यांच्या नाराजीची योग्यवेळी दखल न घेतल्यास ते मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

वडेट्टीवार यांच्याकडे ओबीसी, खार जमीन विकास आणि भूपंक पुनवर्सन खाते देण्यात आले आहेत. या खात्यांचे स्वतंत्र असा दर्जा नाही. ही खाती अन्य खात्याशी जोडल्या गेली आहेत. त्यामुळे कोणत्या खात्याचा पदभार स्वीकारावा, असा प्रश्न वडेट्टीवार यांना पडला आहे. यावरून ते प्रचंड नाराज असून भ्रमणध्वनी घेण्याचे टाळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे. गेली पाच वर्षे पक्ष वाढवल्यानंतर तुलनेने दुय्यम खाते देऊन वडेट्टीवार यांचा पक्षाने अपमान केला आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्ह्य़ात पक्ष टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार चंद्रपूरचाच आहे. शिवाय त्यांची चंद्रपूर जिल्ह्य़ातील आमदारांची संख्या वाढवली आहे. मात्र, त्यांच्यावर खातेवाटपात अन्याय झाला आहे. त्यांनी दोन दिवसांपासून संवाद साधण्याचे टाळले असून ते प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय हालचालीकडे लक्ष लागले आहेत. त्यातच त्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहून सूचक इशारा दिला आहे.

मात्र, अद्यापही पक्षातील वरिष्ठांना त्यांच्या संपर्क साधलेला नाही. हीच संधी साधून भाजपने देखील कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांच्यावर अन्याय झाला आहे. या दोन्ही नेत्यांना कमी महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. वडेट्टीवार यांनी काँग्रेस सोडल्यास त्यांचे भाजपात स्वागत आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय वडेट्टीवार यांना घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद हवे

चंद्रपूर : सचिव नसलेल्या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यामुळे वडेट्टीवार नाराज आहेत. एखाद्या खात्याचे अतिरिक्त मंत्रीपद तथा चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्हय़ाचे पालकमंत्रीपद मिळाल्यास त्यांची ही नाराजी दूर होऊ शकते. अन्यथा ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा वडेट्टीवार समर्थकांच्या वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, वडेट्टीवारांना दोन्ही जिल्हय़ाचे पालकमंत्रीपद मिळू नये यासाठीही त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू नये यासाठीही सक्रिय राजकारणातील काँग्रेसचा एक गट काम करीत होता. त्याच गटाने पुन्हा दिल्ली दरबारी तक्रारींचा सपाटा सुरू केला असल्याची माहिती आहे. कमी महत्त्वाचे मंत्रीपद दिल्याने वडेट्टीवार समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचाच परिणाम काहींनी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. समाज माध्यमातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी उघडपणे दाखवण्यास सुरुवात केली आहे.