विलास मुत्तेमवार यांची टीका; काँग्रेसचे संविधान चौकात लाक्षणिक उपोषण

बांधकामाच्या निविदांच्या मागे काय काळेबेरे चालते, हे उघड गुपित आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा तर निविदा (टेंडर) काढण्यात हातखंडा आहे. यामुळे भाजपने निविदा काढण्याची सर्व खाती त्यांच्याकडे सोपवली आहेत, अशी खोचक टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केली.

मोदी सरकारची द्वेषपूर्ण भूमिका आणि दलितांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांच्या निषेधार्थ सोमवारी संविधान चौकात शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार, प्राचार्य बबनराव तायवाडे, अनंत घारड, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, कुंदा राऊत आदी मंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. यावेळी संवाद साधताना मुत्तेमवार यांनी मोदी सरकारच्या दलित, मुस्लीम आणि ओबीसी समाजविरोधी भूमिकेवर सडकून टीका केली. भारत बंद दरम्यान दलितांवर अत्याचार करण्यात आले, त्यांना ठार मारण्यात आले. यात भाजप आणि केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी नितीन गडकरी यांनाही लक्ष्य केले. निविदा काढण्यात गडकरी यांची कुणी बरोबरी करू शकत नाही, अशा या आमच्या नेत्याने नागपूरची वाट लावली आहे. एकदा सत्तेवर आणा, वेगळा विदर्भ देऊ. मिहानमध्ये दरवर्षी ५० हजार लोकांना रोजगार देऊ, असे सांगणारा हा ‘मर्द बच्चा’ आता या दोन्ही मुद्यांवर बोलत नाही. अशाप्रकारे खोटे बोलून लोकांची मते त्यांनी घेतली व आता फसवणूक केली आहे, असे मुत्तेमवार म्हणाले.

दरम्यान, आज सकाळी साडेदहा वाजतापासून संविधान चौकात काँग्रेस नेते, कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. साधारणत:  बाराच्या सुमारास सर्व नेते उपोषण मंडपात बसले होते. वातारण निर्मितीसाठी पक्षाचे झेंडे तसेच काळे झेंडे लावण्यात आले, तर ध्वनिक्षेपकावर ‘वैष्णव जन तो..’ आणि ‘रघुपती राघव..’ हे भजन वाजवण्यात येत होते.

समाजात द्वेष निर्माण करणारी केंद्र सरकारची भूमिका आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्य़ात लाक्षणिक उपोषण सोमवारी करण्यात आले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने हे आंदोलन होत असल्याने अपवाद वगळता शहरातील सर्व प्रमुख नेते, नगरसेवक, विविध आघाडय़ांचे प्रमुख आंदोलनात सहभागी झाले होते. काही नेते आणि पदाधिकारी उपोषण मंडपाला भेट देत काही मिनिटांत निघून गेले, तर काहींनी पूर्णवेळ उपोषण आंदोलनात सहभाग नोंदवला.

राऊत भंडाऱ्यात, अहमद दिल्लीत

या आंदोलनात नागपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे सर्वच नेते एका व्यासपीठावर दिसले. अनु.जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी मुत्तेमवार गटाशी समोरासमोर येण्याचे टाळण्यासाठी माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत भंडारा येथील उपोषण आंदोलन सहभागी होण्याचा मार्ग निवडला, तर अखिल भारतीय काँग्रेस समितीवर सदस्यत्व मिळालेले माजीमंत्री अनीस अहमद हे दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले. त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र, संविधान चौकात उपोषणाला बसले होते.

केदार यांचे औटघटकेचे आंदोलन

जिल्ह्य़ातील काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे उपोषण मंडपात साधारणत: दुपारी १.१० वाजता आले. ते शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यामध्ये जाऊन बसले. ते राजेंद्र मुळक यांच्याशी काही मिनिटे चर्चा करत होते आणि फोनवर बोलत होते. त्यानंतर १५ मिनिटांतच ते मंडपातून निघून गेले.

 

संविधान चौकात उपोषणाला बसलेले काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते. (लोकसत्ता छायाचित्र)