News Flash

आक्रोशातही काँग्रेस नेत्यांकडून मतभेदाचे जाहीर प्रदर्शन

महापालिका निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी जनआक्रोश आंदोलनाची मदत झाली आहे.

काँग्रेस कुठेच सत्तेत नसतानाही नेत्यांमधील बेदिली काही शमताना दिसत नाही, नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन शहरातील काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मतभेदाचे जाहीर प्रदर्शन केले.

शहर काँग्रेसने सोमवारी नोटाबंदीच्या विरोधात जनआक्रोश दिन पाळला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झिरो माईल चौक येथून जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. व्हरायटी चौक, सीताबर्डी मार्केट, लोखंडी पूल, शनि मंदिर, महाराष्ट्र बँक चौक, झांशी राणी चौक मार्गे व्हरायटी चौक अशी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला. येथे नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली, तसेच सरकारविरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला. दुसरीकडे उत्तर नागपुरातील इंदोरा चौकात माजीमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चौकात मानवी शृंखला करून चक्का जाम करण्यात आला. अशाप्रकारे नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन करताना देखील शहरातील काँग्रेस नेते एकत्र आले नाहीत. त्यांनी आंदोलनातही काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचे चित्र उभे केले.

काँग्रेसची महापालिकेसह राज्य आणि केंद्रात सत्ता नाही. शिवाय सोमवारी जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल देखील काँग्रेससाठी आशादायी नाही. काँग्रेस एवढय़ा वाईट अवस्थेतून जात असताना शहरातील काँग्रेस नेते मात्र हेवेदावे सोडून एकत्र येण्यास तयार नाहीत. नेत्यांच्या अशा वागण्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होणार असून, त्याचा फटका काँग्रेसला निश्चितच महापालिकेच्या निवडणुकीत बसेल, याचे भाकित करण्याची ज्योतिषाची गरज नाही.

महापालिका निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी जनआक्रोश आंदोलनाची मदत झाली आहे. मात्र, ग्रामीण विदर्भातील नगर परिषदेचे चित्र बघितल्यास काँग्रेसला गेलेली पत पुन्हा मिळवणे एवढे सोपे नसल्याचे दिसून आले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना हा जनआक्रोश मतपेटीतून व्यक्त होऊ शकला नाही. याची चिंता काँग्रेसला असून नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. यानंतरही काँग्रेस नेत्यांची बेदिली सुरूच आहे.

गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत भाजपचे सरकार आहे. नागपूरचे मुख्यमंत्री आणि एक केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्याकडून महापालिकेवर झेंडा टिकवण्यासाठी सत्ता आणि पक्षाचा पुरेपूर उपयोग होणार हे निश्चित आहे. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधी वातावरण निर्माण करण्यात काँग्रेसला अद्यापही यश आलेले नाही. हेच ग्रामीण भागातील निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे.

नोटाबंदी विरोधात इंदोरा चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन उत्तर नागपूर मतदारसंघापुरते मर्यादित होते. शहर काँग्रेसने कोणते आंदोलन केले आपल्याला माहिती नाही. मानवी शृंखला करून चक्का जाम करण्यात आला. त्यानंतर मला आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

– नितीन राऊत, माजीमंत्री

शहर काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेसाठी शहरातील सर्वच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. माजीमंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मतदारसंघापुरते आंदोलन केले. आमचे आंदोलन संपूर्ण शहराचे होते.

– विकास ठाकरे, शहराध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:38 am

Web Title: congress leaders dispute seen in jan aakrosh rally
Next Stories
1 विदर्भात महिलांच्या ‘अबोली’ ऑटोरिक्षांचा पत्ताच नाही!
2 जल, वायू प्रदूषणामुळे ‘ओडोनाटा’ प्रजाती संकटात
3 गुणवत्ता वाढीची जबाबदारी शैक्षणिक संस्थावर – गडकरी
Just Now!
X