पुढील लोकसभा निवडणुकीची आतापासून तयारी

महाराष्ट्र आणि हरयाणात अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याने काँग्रेसने पुढील लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रातील कणखर विरोधी पक्ष प्रतिमा तयार होण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीला सहा महिने होण्यापूर्वीच देशभर आंदोलन सुरू केले आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापण्याची संधी मिळाल्यानंतर पक्षाला उत्साह निर्माण झाला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाने पक्ष पार खचून गेला. त्यामुळे महाराष्ट्र आणि हरयाणात संपूर्ण शक्तीनिशी लढला नाही. तरीही या दोन्ही राज्यात लोकांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले. थोडय़ा-थोडय़ा फरकारने अनेक जागांवर काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. निवडणुकीच्या निकालातून लोकांनाच काँग्रेस हवे आहे, असे चित्र निर्माण झाले. त्याचा परिणाम काँग्रेसच्या धुरिणांवर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी ५ ते १५ नोव्हेंबर दरम्यान देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. याद्वारे आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि शेतकरी आत्महत्या हेच मुद्दे पुन्हा जनतेसमोर आणण्यात येणार आहे. भाजपने राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० आणि भारत-पाकिस्तान अशा मुद्यांवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत गेला होता. मात्र, त्याला फारसे यश त्यांना मिळाले नाही. हे हेरले आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या नावाखाली लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आतापासून सुरू केला आहे.

भाजपचे सत्तेसाठी काहीही..

काँग्रेस महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेईल, असे सांगून सत्ता स्थापनेबाबत पत्ते खुले करण्याचे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा टाळले. तसेच आम्हाला विरोधीपक्ष म्हणून जनादेश मिळाला असल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपवर सत्तेस्थापनेबाबत जोरदार टीका केली. भाजपचा काही राज्यातील सत्ता स्थापनेचा इतिहास बघितल्यास ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. त्यांनी घटनात्मक संस्थांना विनोदाचा विषय करून ठेवला आहे. राजभवन, न्यायालयाचा वापर त्यांच्याकडून झाला आहे. ईडी, सीबीआयची तर त्यांच्याशी महायुती आहे. त्यांनी गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, ईशान्येकडील राज्य, कर्नाटकमध्ये घोडेबाजार केला, असा आरोप एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी केला.

‘‘गेल्या साडेपाच वर्षांपासून आम्ही हे मुद्दे उचलत आहोत. लोकांचे प्रश्न वारंवार उचलणे विरोधी पक्षाचे ते कर्तव्य आहे. लोकसभा निवणूक हरल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आम्ही लोकांमध्ये जात आहोत.’’– पवन खेडा, प्रवक्ता, काँग्रेस.