नितीन गडकरी यांची ग्वाही

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गेल्या ५० वर्षांत विकासासाठी केवळ आश्वासने मिळाली. मात्र प्रत्यक्षात शहराचा कुठेच विकास झाला नाही. गेल्या पाच वर्षांत या शहराचा सर्वागीण विकास करण्यात आला असून नागपूर शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ गोपालनगरमध्ये आज गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, शहराचा सर्वागीण विकास करताना अनेक योजना शहरात सुरू करण्यात आल्या आहेत. याचे श्रेय मुख्यमंत्री किंवा माझे नाही तर जनतेचे आहे. तुम्ही आम्हाला निवडून दिले म्हणून आम्ही हे करू शकलो. आम्ही गेल्या पाच वर्षांत कुठल्याही जाती धर्म, पंथाचा विचार केला नाही. प्रत्येक धर्माला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचा सर्वागीण विकास झाला पाहिजे, हे ध्येय समोर ठेवत काम केले आहे. निवडणूक ही उमेदवारांची परीक्षा घेणारी असते, ज्यांनी चांगली कामे केली ते निवडून येतात. मुख्यमंत्र्यांनी राज्यासह विदर्भात आणि शहरात मोठय़ा प्रमाणात विकास कामे केली आहेत, नागपुरात मेट्रो सुरू झाली, सोबतच डबल डेकर पूल सुद्धा बनवण्यात येत आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा  करणारी नागपूर महापालिका पहिली आहे. एवढेच नाही तर  सांडपाणी पाणी विकण्याचा विक्रम सुद्धा नागपूरने केला आहे. ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना नागपुरात प्रथम आणली. त्यामुळे शहराला आजूबाजूचे शहर जोडले जातील. शहरात एम्स आणले असून रोज मोठय़ा प्रमाणात रुग्ण त्याचा लाभ घेत आहे. नागपूर एज्युकेशन हब बनाव,े यासाठी सिंबॉयसिस नागपुरात आणले आहे.   नागपूरला देशातील पहिल्या नंबरचे शहर बनवल्या शिवाय मुख्यमंत्री आणि मी थांबणार नाही, असेही गडकरी म्हणाले.