काँग्रेसचे इंधन तर भाजपचे वीज दरवाढीविरोधात आंदोलन; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

नागपूर : इंधन आणि वीज यांच्या दरात अभूतपूर्व वाढ  झाल्याने त्याचे चटके सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. मात्र राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांनी या मुद्याचे राजकारण सुरू केले असून आज सोमवारी इंधन दरवाढीसाठी केंद्रातील भाजप सरकारला दोषी ठरवत काँग्रेसने तर वीज दरवाढीसाठी काँग्रेसला दोषी ठरवत भाजपने आंदोलने  केली.

काँग्रेसतर्फे आज संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देत होते. या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार ठाकरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी, सुरेश भोयर, कुंदा राऊत, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर सहभागी झाले होते.

मोदी सरकार पेट्रोल-डिझेलची सतत  दरवाढ करून जनतेची लूट करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल स्वस्त असताना किमती का वाढण्यात येत आहे, याचे उत्तर मोदी यांनी दिले पाहिजे, असे आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसने एक आलेख  जारी केला आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किमती आणि संपुआ आणि भाजप सरकार काळातील पेट्रोल, डिझेल प्रतिलिटरचे दर दिले आहेत. २००८ आणि २०२० मध्ये कच्च्या तेलाच्या किमती जवळपास सारख्या आहेत. तरीही मोदी सरकारने पेट्रोलचे दर दुप्पट तर डिझेलदर सव्वापट वाढवल्याचा दावा या तक्तयातून करण्यात आला. महिला काँग्रेसच्या वतीने नगरसेविका हर्षला साबळे, अपूर्वा थोरात यांच्या नेतृत्वात पेट्रोल-डिझेल दरवाढी निषेधार्थ खंडोबा मंदिर, कॉटन मार्केट येथे  निदर्शने करण्यात आली.

इकडे भाजपने वीज देयक भसमसाठ आल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असल्याचे सांगून ही वीजदरवाढ मागे घेण्याची मागणी केली. वीज दरवाढीविरोधात भाजपने शहरातील सहा ठिकाणी आंदोलन केले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावरोधात घोषणा देण्यात आल्या. टाळेबंदीत उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. लोकांच्या हाताला काम नव्हते. वर्ग दोन, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली. एकीकडे सरकार म्हणते, शैक्षणिक शुल्क वाढवू नका, घरभाडे वाढवू नका आणि स्वत: सावकाराप्रमाणे वीज देयक देत आहे. एप्रिल महिन्यात ६० टक्के वाढ झाली आहे. योग्य वीज देयक देण्यात यावे. नाहीतर उपस्टेशनसमोर वीज देयकांची होळी केली जाईल, असा इशारा यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिला.

तुळसीबाग सब स्टेशनजवळ प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, काँग्रेस नगर चौकात महापौर संदीप जोशी आणि माजी महापौर नंदा जिचकार , छापरू चौकात आमदार कृष्णा खोपडे आणि खासदार डॉ. विकास महात्मे, ऑटोमोटिव्ह चौकात प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने यांच्या नेतृत्वात तर काटोल रोड चौकात आमदार अनिल सोले, परिणय फुके आणि तुकडोजी पुतळ्याजवळ आमदार मोहन मते आणि आमदार ना.गो. गाणार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

वाहनाला दोरखंड

युवक काँग्रेसने कामठी रोड इंदिरा चौक येथे  चारचाकी वाहनाला दोरखंड बांधून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. या आंदोलनात कुणाल राऊत, अजित सिंह, धीरज पांडे सहभागी झाले होते.