महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसला सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्याचा आधार वाटत असलातरी घोटाळे उघडकीस आणून त्याची चौकशी करण्यास भाग पाडून जनमत तयार करण्यात फारसे यश आल्याचे दिसून येत नाही. भाजपने डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २-जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ आणि इतर प्रकरणे उघडकीस आणून जनमत तयार करण्यात यश मिळविले होते. त्याप्रमाणे काँग्रेसला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घोटाळ्यांची चर्चा घडवून आणण्यात सातत्य राखता आलेले नाही.

रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी डांबर घोटाळा कारिणीभूत आहे. त्यामुळे घोटाळा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे मात्र सर्वसाधारण सभेत खड्डय़ांवरील चौकशी अहवालावर चर्चा होऊ दिली नाही. विरोधीपक्षाला चर्चेच्या माध्यमातून चौकशी कशी थातूरमातूर आहे हे दाखवून देता आले असते. जनता खड्डय़ातून वाट शोधत असताना चौकशी समितीला खड्डे दिसत नाहीत. डांबरीकरण झालेले रस्ते वर्ष होत नाही तर उखडतात, असा हल्लाबोल करण्याची संधी होती. सत्ताधारी घोटाळ्याची चौकशी होऊ देत नाही, केलीच तर बिलंब होतो. त्यामुळे चर्चेला काही अर्थ उरत नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली. यामुळे सत्ताधारी भाजपचे फावले. घोटाळ्यांवर चर्चा न झाल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात हवे त्या प्रमाणात वातावरण निर्माण होऊ शकले नाही. स्टारबस घोटाळ्याचा चौकशी अहवाल निवडणूक संपल्यावर येणार आहे. कनक र्सिोसेसने कचरा गाडीच्या वजन मोजण्यात गैरव्यहाला करून महापालिकेकडून कोटय़वधी रुपयांची वसुली केली. त्यात केवळ थातूरमातूर कारवाई झाली.

स्मशान घाटावरील लाकूड पुरवठा करण्यात घोटाळा झाला. शहरातील पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले. यामुळे महापालिकेला कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. शासकीय निधीतून जलवाहिन्या आणि इतर कामे करून पाणी पुरवठा यंत्रणा बळकट करण्यात आली. पाणी देयक मात्र ओसीडब्ल्यू वसूल करीत आहे. इतर प्रकरणेही बाहेर आली. परंतु त्यांचा राजकीय लाभ काँग्रेसला अजूनतरी घेता आलेला नाही.

विरोधी पक्षाकडे सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी असते. शिवाय महापालिका आयुक्तांना घेराव घालणे आणि इतर आयुधांचा वापर करता येतो. या संसदीय आयुधांचा वापर करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पडण्याची संधी गमावली, असे आजवरच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावर लक्ष टाकल्यावर दिसून येते. विरोधीपक्षांनी अनेकदा नोटीस एका विषयाची दिली आणि चर्चा दुसऱ्या विषयावर केलेली आहे. स्टार बस वगळता एकाही प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना भाव दिलेला नाही. घोटाळे उघडकीस आले, परंतु ते प्रकरण तडीस गेले नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यात कमी पडले दिसते. यामुळे सत्ताधाऱ्यांवर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले. परंतु ते जनमानसापर्यंत पोहचल्याचे दिसून येत नाही.

विरोधीपक्ष नेता म्हणून महापौरांना स्टार बस प्रकरणात आदेश देण्यास भाग पाडले. घाटावरील लाकूड प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास लावले. विविध घोटाळे उघडकीस आणून त्याविरोधात सभागृहात भांडलो. महापौरांना नामोहरण केले. याशिवाय मोर्चे आणि निदर्शने केली. महापौरांनी सभागृहात आदेश दिल्यानंतर पळ काढण्यासाठी निवृत्ती न्यायाधीशांची चौकशी लावण्यात आली. विरोधक म्हणून सत्ताधारी भाजपने गेल्या नऊ वर्षांत केलेले विविध घोटाळे चव्हाटय़ावर आणले.

-विकास ठाकरे विरोधी पक्ष नेता, महापालिका.