News Flash

मुत्तेमवार गटालाही काँग्रेस श्रेष्ठींकडून इशारा

शहरात नवीन नेतृत्व उभे करून काँग्रेसला शहरात जुने वैभव निर्माण करून देण्याची योजना आखण्यात आली आहे.

मुत्तेमवार गटालाही काँग्रेस श्रेष्ठींकडून इशारा
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेसने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना बाहेर रस्ता दाखवल्यानंतर थेट कोणतीची कारवाई न करता त्यांच्या विरोधी मुत्तेमवार गटाला हादरा देण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची चुणूक माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना लागली असून आगामी लोकसभेसाठी पर्यायी चेहऱ्यावर आतापासून विचार सुरू झाला आहे.

नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील वादामुळे कार्यकर्ते परागंदा झाले. शहरातील काँग्रेस दुबळी झाली. यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसने चतुर्वेदी यांच्यावर कठोर कारवाई केली आणि पक्षातील संधीसाधूंना नकारात्मक तर निष्ठावंतांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यापुढे जाऊन काँग्रेसने शहर काँग्रेसमध्ये बदल घडवण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचेही (मुत्तेमवार समर्थक) महत्त्व कमी करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना विलास मुत्तेमवार यांच्या पर्यायाचा शोध सुरू झाला आहे. पक्षाने याबाबत संकेत देखील दिले आहेत.

राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा होत असलेल्या अधिवेशनाच्या तयारीसाठी स्थापन सुकाणू समितीमध्ये मुत्तेमवार  नाही. नवीन कार्यकारी समिती अस्तित्वात येईस्तोवर सुकाणू समितीच कार्यकारी समिती असणार आहे. मुत्तेमवार पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील  कार्यकारी समितीमध्ये ते कायम सदस्य होते.

राहुल गांधी यांनी पक्षाची कमान स्वीकारल्यानंतर नवीन चेहरे आणि युवकांना संधी देण्याचे धोरण हाती घेतले आहे.  शहरात नवीन नेतृत्व उभे करून काँग्रेसला शहरात जुने वैभव निर्माण करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. मुत्तेमवार यांना याची कल्पना आली आहे. त्यामुळे ते  स्वत:च आपल्या निष्ठवान कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याबाबतच्या सूचना खासगीत करू लागले आहेत. दुसरीकडे कार्यकर्ते देखील   नवीन चेहऱ्याला संधी दिल्याशिवाय भाजपला आव्हान देता येणार नाही, असे सांगत आहेत. मुत्तेमवार यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप नाही. तसेच त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका नाही. परंतु प्रत्येकाला कुठेतरी थांबावे लागते आणि बदलेली राजकीय   स्थितीचा सामना करावा लागते, असा सूर त्यांच्याच गोटात उमटू लागला आहे.

माजी मंत्र्यांना इशारा

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पक्षात प्रवेश देवून माजी मंत्री नितीन राऊत यांना इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मध्य नागपुरातून हलबा समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची शक्यता तपासून माजी मंत्री अनीस अहमद यांना ताटकळत ठेवण्यात रणनीती दिसून येत आहे.

दक्षिणेत नवा पर्याय

मुत्तेमवार यांनी सुपुत्र विशाल यांना दक्षिण नागपुरातून संधी मिळावी यासाठी प्रयत्न आहेत, परंतु येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पुढे आलेले बबनराव तायवाडे यांच्यावर लक्ष केंद्रित  केले जाऊ लागले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून पुढील महिन्यात पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपुरात एकत्रितपणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 2:04 am

Web Title: congress searching option for vilas muttemwar in lok sabha election
Next Stories
1 चव्हाणांकडून जातीयवादी शक्तींना बळ – चतुर्वेदी
2 मोहन भागवतांच्या वक्तव्याचे सुमित्रा महाजनांकडून समर्थन
3 बारा जिल्ह्य़ांत ‘स्टार्टअप इको सिस्टम’-मुख्यमंत्री
Just Now!
X