नागपूर : करोना संकटकाळात वारंवार  राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा,

असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, करोना महासाथीच्या आजाराशी  राज्य सरकार आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा खंबीरपणे लढा देत असताना  फडणवीस वारंवार राजभवनात जातात आणि राज्यपालांना सरकार विरोधात निवेदन देऊन घाणेरडे राजकारण करीत आहेत.

या संकट काळात राजकारण न करता राज्याला केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत.

फडणवीस यांनी काल राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत करोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, खाटा उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमार होत आहे असे आरोप सरकारवर केले.

राज्यात लोकनियुक्त सरकार असताना फडणवीस वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सूचत नाही, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीला मदत का नाही?

आपण व आपल्या पक्षाचे आमदार, खासदार महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे न देता पीएम केअर्सला पैसे देतात. कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापूर आला तेंव्हा आपण मुख्यमंत्री होतात. लाखो हेक्टरवरील पिके वाया गेली, हजारो जनावरे वाहून गेली, लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्यावेळी आपण काय केले, असा सवालही लोंढे यांनी फडणवीस यांना विचाराला आहे.