काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे गुरुवारी नागपूरसह विदर्भात सर्व जिल्ह्य़ात तीव्र पडसाद उमटले. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेसने नागपूरसह विदर्भात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत ठिकठिकाणी रस्ता रोको, निदर्शने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून करून घटनेचा  निषेध नोंदवला.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचे कळताच काँग्रेसचे पदाधिकारी गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनासमोर जमा झाले. त्यांनी पंतप्रधान  मोदी आणि आदिनाथ यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.  यूपी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली. योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी. पीडित कुटुंबावर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेला अत्याचार, राहुल गांधी यांना धक्काबुक्की व अटकेचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली.

भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने  आणि रास्ता रोको करण्यात आला. गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसने कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.

चंद्रपूर येथे गांधी मोदी-योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तर अकोला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्य़ात निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला.

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांचा कॅन्डल मार्च

नागपूर : हाथरस  प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी  मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी मार्डच्या बॅनरखाडी कॅन्डल मार्च काढला. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातून अधिष्ठाता कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या पद्धतीची विकृत प्रवृत्ती कुणीही खपवून घेणे योग्य नसल्याचे सांगत आरोपींना तातडीने शिक्षा करण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात मार्डचे उपाध्यक्ष डॉ. रजत मुधोळ, कोविड टास्क फोर्सचे डॉ. सिंग, डॉ. शक्ती कालरा यांच्यासह इतरही निवासी डॉक्टर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जोरदार घोषणाबाजी

नागपुरात काँग्रेसने पक्षाच्या कार्यालयासमोर आणि उत्तर नागपुरात युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी मोदी आणि योगींविरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

नागपुरातील साथ नियंत्रणासाठी के लेल्या प्रयत्नाला काही अंशी यश आलेले आकडेवारीवरून दिसून येत आहे. ही साथ नियंत्रणातच राहावी म्हणून नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

– नितीन राऊत, पालकमंत्री.