कार्यकर्त्यांकडून देयकांची होळी 

विजेच्या भरमसाठ वाढलेल्या देयकांमुळे जनता त्रस्त असताना राज्य सरकारने वीजदर वाढ प्रस्तावित केली आहे. त्याविरोधात काँग्रेसने आज बुधवारी एसएनडीएलच्या छाप्रुनगर कार्यालयावर मोर्चा काढला आणि देयकांची होळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात दुपारी १२ च्या सुमारास के.डी.के कॉलेज, गोरा कुंभार चौकातून हा मोर्चा निघाला. विरोधीपक्षात असताना एसएनडीएलच्या विरोधात मोर्चा काढून कंत्राट रद्द करण्याचा मागणी मुख्यमंत्री फडणवीस करीत होते. सत्तेची खुर्ची मिळताच ते लोकांना छळणाऱ्या कंपनीचे समर्थन करीत आहेत. म्हणूनच ही कंपनी मनमानी करीत आहे.

भरमसाठ विजेचे देयक येऊ लागल्याने लोकांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले आहे. असे असतानाही फडणवीस सरकार वीज दरवाढ करायला निघाली आहे, असा आरोप या मोर्चेकरांनी केला. यावेळी फडणवीस सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. जनतेचा रोष बघून एसएनडीएलचे वाणिज्य व्यवस्थापक धर्मेश श्रीवास्तव यांनी कार्यालयाबाहेर येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

या मोर्चात डॉ. प्रशांत बनकर, राजेश माकडे, अंकुश भोवते, शुभम मोटघरे, पुरुषोत्तम लोणारे, प्रवीण बेलेकर, रोशन अंसारी, अर्चना सिडाम, सिंधु मानवटकर, शरीफ गफ्फार शेख, कमलाकर घाटोळे, संदीप देशपांडे, रोशन लारोकर, गणेश कुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेसने या मोर्चाच्या माध्यमातून ३०० युनिटपर्यंत वीजदर ३.५० रुपयांपेक्षा अधिक आकारण्यात येऊ नये ही प्रमुख मागणी केली. याशिवाय थकित देयक माफ करण्यात यावे, सदोष मिटर बदलण्यात यावे, सत्यशोधन समितीचा अहवाल जाहीर करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन अतुल लोंढे यांनी एन.एन.डी.एल.च्या वाणिज्य व्यवस्थापकाला दिले.