News Flash

राज्यातील संग्रहालयांत संवर्धन अधिकाऱ्यांची वानवा 

ला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, उद्योग, नैसर्गिक इतिहास आदींचा संग्रह असणारी ७०० संग्रहालये भारतात आहेत

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : कलात्मक, ऐतिहासिक, सांस्कृतिक मुल्ये असणाऱ्या वस्तू आणि वास्तूंच्या जतन व संवर्धन कार्यात संग्रहालय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी प्रत्येक संग्रहालयात प्रयोगशाळा आणि चांगला संवर्धन अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, भारतातील अनेक प्रयोगशाळांमध्ये, प्रयोगशाळाच नाही तर वैज्ञानिकदृष्टय़ा वास्तुंचे जतन करणारा संवर्धन अधिकारी सुद्धा नाही. विशेष म्हणजे राज्यातील तेराही संग्रहालयात वैज्ञानिकदृष्टय़ा जतन व संवर्धन कार्य करणारी स्थायी स्वरुपाची एकही प्रयोगशाळा नाही. त्यामुळे संवर्धनाअभावी हा वारसा दुर्लक्षित होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर तो नष्ट होण्याची भीती आहे.

कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, उद्योग, नैसर्गिक इतिहास आदींचा संग्रह असणारी ७०० संग्रहालये भारतात आहेत. या संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तुंचा मौल्यवान ठेवा आहे. त्याला पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी विदेशातील पर्यटक येतात. विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा अनुभव!  कित्येकदा अशा वस्तुंची तस्करी होते, कारण बाहेरच्या देशात त्यांना मागणी आहे. अशावेळी ही संस्कृती टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. विदेशात भारतीय कलासंस्कृतीचे मोल आहे, पण भारतात अजूनही त्यांचे मूल्य कळलेले नाही. याचे उदाहरण म्हणजे आजही कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकूटावर आहे. शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनच्या अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. टिपू सुलतानची तलवार देखील बाहेर होती. एका भारतीय नागरिकाने ती भारतात परत आणली, पण सरकारला विदेशात असलेल्या आपल्या देशातील ऐतिहासिक वस्तुंची कदर नाही. महाराष्ट्राच्या उपराजधानीत ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालय आहे, पण या संग्रहालयाची अवस्थाही राज्यातील इतर संग्रहालयापेक्षा वेगळी नाही. या संग्रहालयातील वन्यजीवांच्या ट्रॉफिज जतनाअभावी खराब झाल्या म्हणून जाळून नष्ट केल्या जातात. मात्र, त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी पावले उचलली जात नाही. याच संग्रहालयात कधीकाळी आईच्या गर्भातील बाळाचा नऊ महिन्याचा प्रवास साकारला होता, ज्याला पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक येत. तो ठेवाही नष्ट झाला आहे.

संग्रहालये ऐतिहासिक, कलात्मक आणि सांस्कृतिक संसाधनांचे प्रतिनिधीत्व करतात. यामुळे विद्यार्थी आणि संशोधकांच्या ज्ञानात भर पडते तसेच सामान्य जनतेच्या मनोरंजनासह चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी मदत करते. पर्यटन व्यवसायात संग्रहालय महत्त्चाची भूमिका बजावतात. तसेच देशाच्या आर्थिक बांधणीत सुद्धा संग्रहालयांची भूमिका मोठी आहे. संग्रहालयातील वस्तुंच्या जतनासाठी केंद्राच्या अखत्यारीतील देशातील एकमेव संस्था एनआरएलसी लखनौ येथे आहे. मात्र, देशभरातील संग्रहालय आणि त्यातील वस्तुंची संख्या पाहता ही संस्था त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही.

मध्य भारतातील संस्था

सरकारच्या अखत्यारितील संग्रहालयांमधल्या संकलनाची ही अवस्था आहे, तर खासगी संग्राहक जतनाविषयी किती अनभिज्ञ असतील! सरकारच नव्हे तर खासगी संग्रहालयातील हा अनमोल ठेवा जपला जावा म्हणून ‘दी हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी’ स्थापन झाली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या जतन कार्य करणारी मध्यभारतातील ही एकमेव संस्था आहे. आतापर्यंत या संस्थेने उपराजधानीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यातील ११८ इन्फन्ट्री बटालियनचे चित्र आणि वाघाचे कातडे, वध्रेतील मगन संग्रहालयातील गांधीजींच्या वस्तू, राजभवनच्या कलाकृतींवर तयार केलेला संवर्धनस्थित अहवाल, सातारा आणि औधच्या संग्रहालयातील संग्रहावरील सर्वसमावेशक स्थिती अहवाल, कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज संग्रहालयातील तैलचित्र, मार्बलच्या मूर्ती, हत्तीच्या पायांची फुलदानी, औरंगजेबाची ऐतिहासिक तलवार आदीचे वैज्ञानिकपद्धतीने जतनकार्य या संस्थेने केले आहे.

भारतातील प्रमुख संग्रहालये..

भारतातील काही प्रमुख संग्रहालयांमध्ये भारतीय संग्रहालय कोलकाता, राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय मुंबई, सालारजंग संग्रहालय हैद्राबाद, राज्य संग्रहालय चेन्नई, विश्वेश्वरैय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय बंगळुरू, व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकाता, नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट नवी दिल्ली, सायन्स सिटी कोलकाता ही प्रमुख संग्रहालये आहेत.

१९७७ पासून दरवर्षी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यात येतो. पॅरिसच्या इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियमनेोा दिवसाची सुरुवात केली. समाजाच्या विकासासाठी संग्रहालय कशी महत्त्वाची आहेत, याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी यादिवसाकरिता वेगवेगळी संकल्पना ठरवण्यात येते. ‘हायपर-कनेक्टेड म्युझियम : न्यु अप्रोचेस, न्यु पब्लिक्स’अशी यावर्षीची संकल्पना आहे.

भारतातील संग्रहालयांमध्ये अनमोल ठेवा आहे, पण त्यातील वस्तुंचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन करणारी यंत्रणा त्यात नाही. प्रयोगशाळा नाहीत किंवा योग्य पद्धतीने जतनकार्य करणारे संवर्धक अधिकारी नाहीत. प्रशासनाला ही यंत्रणा उभारण्यासाठी गांभीर्याने विचार करावा लागेल. अन्यथा हा ऐतिहासिक व सांस्कृतीक वारसा नष्ट होईल.

-डॉ. बी.व्ही. खरबडे, महासंचालक, एनआरएलसी, लखनौ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:54 am

Web Title: conservation officer shortage in the museums of maharashtra
Next Stories
1 विद्येच्या मंदिरात पोलिसांचा फौजफाटा
2 महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ‘बायोमेट्रिक’मध्ये फेरफार
3 चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या
Just Now!
X