विदर्भातील तापमानाचे चक्र सातत्याने बदलत असून उन्हाळा सुरू झाला तरी पावसाचे अधुनमधून डोकावणे मात्र अजूनही थांबलेले नाही. त्यामुळे होळीनंतर काहीसा वर चढलेला उन्हाचा पारा रविवारच्या वादळी पावसाने काहीसा खाली आला. आता पुन्हा एकदा उन्हाने डोके वर काढले असून उद्या गुरुवारपासून उन्हाचा पारा चाळीशी ओलांडणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवला आहे.
मार्च महिना उजाडताच तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस विदर्भात सर्वत्र झालेल्या वादळी पावसानंतर आणि गारपिटीनंतर वातावरण काहीसे थंडावले आहे असे वाटत असतानाच मार्चच्या पहिल्याच आठवडय़ापासून उन्हाळयाची चाहूल जाणवायला लागली. तापमानाचा पारा ३७-३८अंशाच्या मध्ये डोकावत असतानाच मार्चच्या मध्यान्हात तो ४० अंशापर्यंत पोहोचला. दरम्यान वादळ, हलका पाऊस यांचे डोकावणे सुरू असतानाच होळीनंतर लगेच रविवारी सायंकाळच्या सुमारास नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाने प्रवेश केला. नागपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर विदर्भात काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. त्यामुळे वातावरण थोडेसे थंडावले. मात्र, आता हवामान खात्याने पुन्हा एकदा तापमान वाढीचे संकेत दिले आहेत. सोमवारी थोडे कमी झालेले तापमान मंगळवारपासून पुन्हा वाढायला लागले. बुधवारी तापमानाने चाळीशी गाठली तर उद्या, गुरुवारपासून तापमानाचा पारा चाळीशी ओलांडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नागपूरसह सर्वाधिक तापणारे चंद्रपूर, अकोला, वर्धा या शहरांतसुद्धा तापमानाचा पारा चाळीशी गाठणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उन्हाळयातील तापमानाच्या झळांनी मार्चच्या मध्यान्हापासूनच नागरिकांच्या घरी कूलर आणि वातानुकूलित यंत्रे सज्ज झाली होती. रात्रीला गरज पडेल तसे चालणारी ही यंत्र आता दिवसाही चालायला लागली आहेत. घरात राहणाऱ्यांचे ठीक, पण घराबाहेर पडणाऱ्यांना वाढते तापमान अंगावर झेलण्यावाचून पर्याय नाही. त्यातही दिवसभराच्या मिळकतीवर गुजराण असणाऱ्या पदपथावरील विक्रेत्यांना तापमानाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. महापालिकेने यंदा ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे, पण त्यातही त्रुटी असल्याने उन्हाच्या झळांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी तो कितपत उपयोगी पडेल, याविषयी शंकाच आहे.