25 May 2020

News Flash

वर्षभरात चार हजार घरे बांधा -मुख्यमंत्री

शहरातील विविध विकास कामांचा आढावा फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी रामगिरीवर घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

‘सर्वासाठी घरे’ या योजनेतून सर्वसामान्यांना परवडेल अशा ४ हजार घरांचे बांधकाम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा व ही योजना वर्षभरात पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचाही आढावा घेतला.

राज्य सरकारकडे प्रलंबित शहरातील विविध विकास कामांचा आढावा फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी रामगिरीवर घेतला. यात स्मार्ट सिटी योजना तसेच नागरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास आदींचा समावेश होता. मलनि:स्सारण, पिण्याचे पाणी तसेच रस्त्याचे बांधकाम करताना स्मार्ट सिटी योजनेची संकल्पना समोर ठेवून विकास कामांचे नियोजन करा, प्रस्तावित ३८ ठिकाणी ४ हजार घरांचे बांधकाम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा एक वर्षांत योजना पूर्ण करा, प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करताना तसेच रस्त्याचे बांधकाम व नागरी सुविधांची कामे याकडे लक्ष द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. नगररचना विभागात प्रलंबित धंतोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व संशोधन केंद्र, सीताबर्डी येथील संत्रा मार्केट, धंतोली येथील भूखंडाच्या बाबतीत विकास योजनेतील फेरबदल, शहराच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल तसेच बीडीपेठ, जरीपटका, बिनाकी गृहनिर्माण योजना, बोरगाव येथील खुल्या जागेवर क्रीडांगण, भांडेवाडी येथील डंपिंग यार्ड आदी प्रस्ताव एक महिन्यात मंजूर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पाटबंधारे विभागाकडून पेंच जलाशयातून महापालिकेला ७८ दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्यासाठी कायमस्वरूपी निधी माफ करण्याबरोबरच सोमलवाडा येथील मोकळी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात यावी. अंबाझरी तलाव परिसर विकास योजनेला मान्यता व अंबाझरी पर्यटन विकासांतर्गत ४४ एकर जागेवर पर्यटनाच्या सुविधा निर्माण करणे, मदर डेअरीला शहराच्या विविध भागात जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व आमदार, उपमहापौर दीपराज पार्डीकर व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे उत्कृष्ट काम

झुडपी जंगलांतर्गत असलेल्या वस्त्यांमध्ये पट्टे वाटपाचे उत्कृष्ट काम नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले असून त्याच धर्तीवर इतर जिल्ह्य़ांतही ही योजना राबवल्यास ५४ हजार हेक्टर जागा सामुदायिक उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शहरातील इंदिरानगरसारख्या वस्त्यांमध्ये पट्टे वाटपाचे काम तत्काळ सुरू करावे तसेच पट्टे वाटप करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामाला प्राधान्य देण्यात यावे.

शहर विकासासाठी निधी

शहरातील १ लाख २६ हजार एलईडी पथदिवे बदलणे, व संपूर्ण यंत्रणेचे मजबुतीकरण, नूतनीकरण करणे या कामासाठी आवश्यक निधी कर्जरूपाने उभारण्यासाठी शासनातर्फे परवानागी दिली जाणार आहे. गांधीसागर तलावाच्या सशक्तीकरण तसेच कोसळलेल्या भिंतीची पुनर्बाधणी करणे यासाठी नगरविकास विभागातर्फे २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सुरेश भट सभागृहासाठी ७७ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. शहर बस बाहतूक शेडचे बांधकाम आणि लेंड्रापार्क येथील जागेसंदर्भात आढावा घेण्यात आला. शहरातील विविध विकास कामांसाठी ३२ कोटी रुपयांचा विशेष निधी आणि अतिरिक्त ६० कोटी रुपयांचा निधी विकास कामाच्या प्रस्तावानुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेने उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 1:57 am

Web Title: construct 4000 homes during a year says chief minister devendra fadnavis
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 मुलांच्या भेटीने कैद्यांचे अश्रू अनावर
2 रोबोटशी खेळताना कर्करुग्ण बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
3 बांबू आणि उसाची तुलना किती व्यवहार्य?
Just Now!
X