‘कोविड संवाद’  कार्यक्रमात तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. पुढील काही काळात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बऱ्याच प्रमाणात आटोपले असेल. १८ वर्षांखालील मुलांना अद्याप लस देण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील मुले बऱ्याच प्रमाणात प्रभावित होऊ  शकतात. ही शक्यता लक्षात घेता बालकांमध्ये करोनासदृश कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे तज्ज्ञांनी सांगितले.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड संवाद’ या कार्यक्रमात संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे आणि नवजात शिशु तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख सहभागी झाले होते. ‘बालक आणि वयस्क व्यक्तींमध्ये होणारा करोना आणि इतर संसर्गजन्य आजार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, करोनामधून पूर्णत: बरे झाले तरी त्यानंतरही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा करोनानंतर होणारा आजार वेगाने पसरत आहे. त्याची लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा आजार होऊ  नये यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. दातांमधून हा आजार वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्वच्छता ठेवा. काळजी घ्या आणि वेळीच उपचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. संजय देशमुख यांनी लहान मुलांमध्ये करोनाची काय लक्षणे असू शकतात, याविषयी सविस्तर माहिती दिली. ताप आल्यानंतर पॅरासिटॅमॉल देऊनही ताप कमी न होणे, सर्दी, हगवण कमी न होणे, चिडचिडेपणा वाढणे, सुस्ती येणे आदी लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वर्षभरापासून करोनामुुळे लहान मुलांना अन्य लसी देण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, यात हलगर्जीपणा नको. एखादी लस घ्यायला उशीर झाला तरी चालेल. उशीर झाला म्हणून ती द्यायचीच नाही, असे करू नका. लहान मुलांसाठी करोना प्रतिबंधक लस अद्याप आली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होऊ  शकतात, असा अंदाज बांधूनच तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले.