News Flash

उपराजधानीत संसर्गजन्य आजारांचे थैमान

शहरातील अनेक भागात अस्वच्छता असून डासांची संख्या वाढली आहे.

*    बालकांना कांजण्याची लागण *    रुग्णालयांत रुग्णांच्या रांगा

बदलते वातावरण, जिवाणू व विषाणूंचे वाढते संक्रमण व प्रदुषणामुळे शहरात संसर्गजन्य आजारांनी थैमान घातले आहे. घरोघरी सर्दी, खोकला, तापासह घशात खवखवी असलेले रुग्ण वाढले असून शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या रांगा वाढल्या आहेत. लहान मुलांमध्ये कांजण्या हा आजारही वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती व्यतिरिक्त काहीच उपाययोजना होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

शहराची लोकसंख्या २५ लाखांवर असून शहरात नोकरी, शिक्षण, व्यवसायासह विविध कामांकरिताही देशभरातील लाखो नागरिक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने स्थानांतरित झाले आहेत. शहरातील सर्वाच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु काही भागात कीटकनाशकांच्या फवारणीसह जनजागृती करण्यापलीकडे हा विभाग फारसे काही करताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीने काही वर्षांपूर्वी शहरातील स्वाईन फ्लूचे मोठय़ा संख्येने होणारे बळी पाहता महापालिकेच्या आरोग्य विभागाला फटकारले होते, त्यानंतरही महापालिकेच्या एकाही रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’च्या गंभीर रुग्णांच्या उपचाराची सोय उपलब्ध नाही.

शहरातील अनेक भागात अस्वच्छता असून डासांची संख्या वाढली आहे. अद्यापही डासांवर हव्या त्या प्रमाणात महापालिकेकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. शहरातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्ह व रात्री थंडीसह बऱ्याचदा ढगाळ वातावरण असे वारंवार बदल बघायला मिळत आहत. त्यामुळे शहरात जिवाणू व विषाणूंचे मानवात होणारे संक्रमण वाढले आहे. त्यामुळे शहरात घरोघरी सर्दी, खोकला, तापासह घशात खवखवीचे रुग्ण वाढत आहेत. हे रुग्ण तोंडावर रुमाल  ठेवण्यासह पुरेशी काळजी घेत नसल्याने हा आजार त्यांच्याकडून इतरांमध्येही झपाटय़ाने संक्रमित होत आहे.

शहरातील मेडिकल, मेयो, डागा, डॉ. आंबेडकर रुग्णालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांत रोज सुमारे दोन हजार रुग्णांची नोंद होत आहे. सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, ताप, अस्थमा, तापासह श्वसनाशी संबंधित आहेत. खासगीतही याहून जास्त रुग्णांवर उपचार होत असले तरी त्याची कुठेही नोंद होत नाही. खासगी बालरोगतज्ज्ञांकडेही लहान मुलांमध्ये या आजारांसह कांजण्या (गोवर) या आजाराचेही प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. प्रत्येक बालरोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या १०० रुग्णांपैकी किमान ८ ते १० मुलांना कांजण्या असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास येत आहे. तेव्हा महापालिका या आजारावर नियंत्रणाकरिता काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

वातारवरणात वारंवार होणारे बदल व वाढलेल्या प्रदुषणामुळे सर्दी, खोकला, तापासह श्वसनाशी संबंधित सगळ्याच वयोगटातील रुग्ण शहरात वाढले आहेत. लहान मुलांची संख्या त्यात जास्त असून मुलांमध्ये कांजण्याचाही आजार वाढला आहे. आजार पसरू नये म्हणून प्रत्येकाने वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, खोकलताना तोंडावर स्वच्छ कापड ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घर वा कार्यालयातून बाहेर जाताना नाकावर मास्कसह स्वच्छ कापड ठेवण्याची गरज आहे. रुग्णांनी वेळीच तज्ज्ञ शासकीय व खासगी डॉक्टरांचा सल्लाही घेण्याची गरज आहे.

– डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2017 4:25 am

Web Title: contagious disease hit nagpur city
Next Stories
1 महिलांना प्रोत्साहन व रोजगारही!
2 ‘खर्च नको पण हिशेब आवर’
3 धर्मादाय रुग्णालयांतील फसवेगिरीला चाप!
Just Now!
X