वाङ्मयाशी संबंध नसलेल्या वक्त्याचे भाषण; निमंत्रण पत्रिकांचा विसर, प्राध्यापक-कर्मचारीही अनभिज्ञ

नागपूर : माय मराठीच्या कक्षा विस्ताराची जबाबदारी ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या खांद्यावर आहे  त्या विद्यापीठाच्या प्रांगणातच मराठीची सातत्याने उपेक्षा होत असते. उपेक्षेचा हा क्रम यंदाही कायम राहिला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यातील विद्यापीठांमध्ये चिंतनीय आणि देखणे सोहळे साजरे होत असताना नागपूर विद्यापीठामध्ये दोन दिवसांआधीपर्यंत कुठेलही नियोजन नव्हते. ऐनवेळी कसेतरी मराठी वाङ्मयाशी संबंध नसलेल्या वक्त्याचे मराठीत भाषण ठेवण्यात आले. ‘लोकसाहित्य : उत्सव मराठीचा’ असा विषय अनिवार्य असताना हे वक्ते नाटकावर बोलले. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, या कार्यक्रमाच्या कुठल्याही निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या नाहीत.  प्राध्यापक-कर्मचारीही या कार्यक्रमाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते.

राज्य शासनाच्या वतीने तीन आठवडय़ांआधी परिपत्र काढत राज्यातील सर्व विद्यापीठांनी यावर्षी ‘लोकसाहित्य : उत्सव मराठीचा’ या विषयावर ‘मराठी भाषा’ दिवस उत्साहात साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठांनी मराठी भाषा गौरव दिन सोहळा उत्साहात साजरा केला. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दोन दिवसांआधी या कार्यक्रमाची आठवणी झाली. त्यामुळे विद्यापीठाने कुठलीही तयारी न करता वेळेवर उपलब्ध होणाऱ्या वक्त्यांना कार्यक्रमाला बोलावाले. कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन नसल्याने साध्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाची माहितीहीच नसल्याचे अनेकांनी सांगितले. विद्यापीठाच्या विविध विभागांनाही कार्यक्रमाच्या एका दिवसाआधी परिपत्रक पाठवले. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनाची विद्यापीठाकडूनच अशी उपेक्षा होत असल्याची खंत  अनेकांनी व्यक्त केली. जवळच्या छोटय़ाशा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ‘स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा’ आयोजित केली होती. यासह चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. अशा निरनिराळे उपक्रम राज्यातील सर्वच विद्यापीठाने घेतले. मात्र, नागपूर विद्यापीठाने  मराठी दिनाचे कुठलेही नियोजन न करता वेळाकाढूपणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

श्रोत्यांचा अभाव

विद्यापीठामध्ये आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला विद्यापीठातील कुलगुरूंसह अनेक अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. प्रसार माध्यमांनाही याची माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील कार्यक्रमाबद्दल सर्वच अनभिज्ञ असल्याने कार्यक्रमालाही श्रोत्यांचा अभाव जाणवला.