वळणमार्गावरील रस्त्यावर निर्धारित पद्धतीला बगल; कराराचाही भंग

सिमेंटच्या वळण मार्गावर (रिंगरोड) रस्ते दुभाजक (सिमेंटचे दगड) लावताना ते वाहनधारकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तयार केलेले असावे म्हणून त्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याची अट घातली असतानाही कंत्राटदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे दुभाजक वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहनधारकांचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.

वळण मार्ग सिमेंटचे करताना सार्वजनिक बांधकाम आणि कंत्राटदार कंपनी आरपीएस इन्फ्रो यांच्यात झालेल्या करारात व  निविदेत ‘हॅड्रोलिक प्रेशर’चा वापर करून तयार केलेले दुभाजक रस्त्याच्या मध्ये लावण्याच्या अटीचा समावेश आहे. त्यासाठी दुभाजक कारखान्यात तयार करायला हवेत.

कंत्राटदाराने मात्र करारातील या अटी व शर्तीचे पालन केले नाही. नरेंद्रनगर ते शताब्दी चौकादरम्यान रिंग रोड सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या कडेला लोखंडी साचे तयार करून दुभाजक तयार केले जात आहेत.

‘हॅड्रोलिक प्रेशर’ने तयार केलेले असावे, कारण ते वाहनधारकांसाठी सुरक्षित मानले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याला याबाबत कल्पना नाही. केवळ प्रायोगिक तत्त्वावर दुभाजक तयार केले. शहरात कुठेच हॅड्रोलिक प्रेशर देऊन तयार केलेले दुभाजक वापरलेले नाहीत, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

रस्त्यावरून जाताना वाहनाला अपघात झाल्यास किंवा वाहन रस्ते दुभाजकावर आदळल्यास दुभाजक जमिनीत जायला हवा. वाहन दुभाजकावर आदळून मागे यायला नको.

यासाठी महत्त्वाचे नियम आहे. वळण मार्गावर आतापर्यंत जे दुभाजक लावण्यात आले त्यासाठी ‘हॅड्रोलिक प्रेशर’चा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे त्यावर आदळेलेले वाहन रस्त्यावर फेकले जाईल. त्यामुळे वाहनधारकाच्या जीवालाही धोका संभवतो.

वळण मार्गाच्या सिमेंटीकरण प्रकल्पात सुमारे १८ कोटी रुपये केवळ रस्ता दुभाजकावर खर्च करायचे आहेत. सध्या ज्या पद्धतीने ते तयार केले जात आहेत. त्यावर केवळ ४ कोटी रुपयेच खर्च येण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराला सुमारे १४ कोटींचा निव्वळ लाभ होईल.

रस्ते दुभाजक तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान आहे. ते महागडे असून ते आपल्या देशात नाही. आपल्याकडे ‘हार्ड स्टोन’ वापरण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर छोटे-छोटे बनवून वापरण्यात येत आहेत.’’

– नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.