News Flash

लोकजागर : कृतिशून्य गांधीवादी!

केवळ देशातच नाही तर जगात गांधीवर प्रेम करणारे कोटय़वधी लोक आहेत.

संग्रहित छायाचित्र

देवेंद्र गावंडे

गांधी म्हणायचे, जे संख्येने थोडे आहेत, त्यांच्या मागे उभे राहा. त्यांचा आवाज बना. अल्पसंख्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी बहुसंख्यांची आहे. गांधींनी निर्माण केलेल्या सेवाकार्याचा व्याप सांभाळणारे गांधीवादी यापैकी काहीही करताना कधी दिसत नाहीत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात सामाजिक दुही माजवणाऱ्या अनेक घटना घडल्या, पण हे गांधीवादी कधी बोलताना दिसले नाही. गांधी म्हणायचे, सरकारचा हेतू अंत्योदयाचा म्हणजे शेवटच्या माणसाच्या विकासाचा हवा. यावरून सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत या अनुयायांनी कधी दाखवली नाही. गांधी म्हणत, संपत्ती ही आपली नसून समाजाची आहे. आपण केवळ तिचे विश्वस्त आहोत अशी भावना प्रत्येक श्रीमंतामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्या अनुयायांनी याकडे कधी लक्षच दिले नाही. उलट आज ते सेवाकार्याच्या निमित्ताने जमा झालेल्या संपत्तीवरून एकमेकांशी भांडताना दिसतात. गांधी म्हणत, विचार मूल्याधिष्ठित असायला हवेत. जातीधर्माच्या आधारे नकोत. धार्मिक अहंता वाईट, उलट ज्यातून साऱ्यांचे कल्याण होईल असा मानवधर्माचा विचार हवा. हे अनुयायी यासाठी प्रयत्न करताना कधी दिसत नाहीत. मग या अनुयायांनी गेल्या सत्तर वर्षांत काय केले तर गांधींनी निर्माण केलेले आश्रम, त्यांचे सेवाकार्य नुसते सांभाळले. स्वत:ला यात बंदिस्त करून सुरक्षित जगण्याचा मार्ग तेवढा स्वीकारला. जास्तच कठोर शब्दात मांडायचे तर गांधींचा वारसा बँकेत ठेवून त्यावरचे व्याज खाण्याचे काम तेवढे केले.

या मंडळींनी समाजाचा, देशाचा विचार करणे सोडून दिले. त्यामुळे आज पदासाठी जाहीरपणे भांडणाऱ्या या अनुयायांना कुणीही गंभीरपणे घ्यायला तयार नाही. समाज त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण त्याच्यासाठी त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही. सरकार नावाच्या यंत्रणेला ते निरुपद्रवी वाटतात. त्यामुळे तेही त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. विरोधकांना या अनुयायांची भीतीच वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे तेही यांची यत्किंचितही दखल घेत नाही. केवळ देशातच नाही तर जगात गांधीवर प्रेम करणारे कोटय़वधी लोक आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांनाही या अनुयायांबद्दल प्रेम वाटत नाही. नथूरामने गांधींना एकदाच मारले. हे अनुयायी अशी भांडणे करून रोज त्यांच्या विचाराची हत्या करू लागले आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया  गांधीप्रेमी व्यक्त करताना दिसतात. आपली अवस्था पावसाळ्यात उगवणाऱ्या निरुपद्रवी देवगाईसारखी झाली आहे. माणुसकीच्या नात्याने कुणी त्यावर पाय देत नाही एवढेच. हे सुद्धा या अनुयायांच्या अजून लक्षात आलेले दिसत नाही. हे अनुयायी स्वत:च निर्माण केलेल्या फुकाच्या नैतिक अहंगडात एवढे अडकले आहेत की या वादामुळे आपले सार्वत्रिक हसू होते आहे याचीही कल्पना त्यांना नाही.

गांधींच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी थोडीफार धावपळ करायची. कुणी महत्त्वाचा पाहुणा आला तर समोर समोर करायचे व इतरवेळी गांधींच्या कृपेमुळे निर्माण झालेल्या पसाऱ्यात गुडूप व्हायचे. समाज, देश, माणूस यापैकी कुणाशीही संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची. गांधींना त्यांच्या अनुयायांकडून हे अपेक्षित होते का? असले प्रश्नही या अनुयायांना कधी पडताना दिसले नाही. गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचे सेवाकार्य अव्याहतपणे सुरू राहावे, त्यांच्या विचारांना कृतीतून चालना मिळावी यासाठी नेहरू, पटेलांनी सर्व सेवा संघाची स्थापना केली. आज या संघात नळावरची भांडणे सुरू झाली आहेत. याच संघातील काहीजण सेवाग्राम आश्रम संचालित करणाऱ्या प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीवर जातात. आता असे जायला मिळावे म्हणून वाद उकरून काढले जात आहेत. भूदानच्या जमिनीत घोटाळे केले इथवर या वादाची मजल गेली आहे. आज गांधी असते तर त्यांनी ही वेळच येऊ दिली नसती व तरीही वाद निर्माण झाले असते तर त्यांनी संस्थाच बरखास्त केली असती. सध्या तर संस्थेवर ताबा मिळवणे, त्यासाठी एकमेकांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणे असे दुर्दैवी प्रकार सुरू झाले आहेत. शेकडो गांधीप्रेमी ही भांडणे असहाय्यपणे बघत आहेत, तर विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. या भांडणात हिरिरीने सहभागी झालेल्या अनुयायांना अनेक स्थानिक बदमाश राजकारण्यांनी घेरले आहे. अर्थात या सर्वाचा डोळा या संस्थेत शिरकाव करण्यावर आहे. ही स्थिती निर्माण होण्याला सर्वस्वी जबाबदार हे अनुयायीच आहेत. समाजाने दखल घ्यावी असे काहीही यांच्या हातून कधी घडलेले नाही.

आजपासून २५ वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशींनी याच सेवाग्राममध्ये एक भाषण दिले होते. गांधींच्या सावलीत मोठे होणे, नंतर त्यातून बाहेर पडून इतरांसाठी सावली निर्माण करणे हे खरे अनुयायांचे काम. ते त्यांनी कधी केलेच नाही असे परखड बोल तेव्हा त्यांनी सुनावले होते. आजही यात अजिबात बदल झालेला नाही. अजूनही हे अनुयायी गांधींच्या सावलीतच राहू इच्छितात. त्यातून बाहेर पडण्याची हिंमत त्यांनी कधी दाखवली नाही. गांधींचा पराभव त्यांच्या शिष्यांनी केला असे जे म्हटले जाते ते येथील स्थिती बघून तंतोतंत खरे आहे याची खात्रीच पटते. आपले खुजेपण लपवण्यासाठी हे अनुयायी अनेकदा असत्याचा आधार घेतात. आश्रम प्रतिष्ठान वा संघाने राजकारणावर बोलू नये असा दंडक या सर्वानी घालून घेतला. त्यामुळे व्यक्त होण्याचे दरवाजे यांनी स्वत:च बंद करून टाकले. राजकारणावर नका बोलू पण देशातील स्थिती, घटना यावर बोलायला यांना कुणी रोखले नाही. तरीही चूप कसे राहता येईल याकडेच या साऱ्यांचा कल असतो. इतकी कृतिशून्यता अंगी बाळगल्यावर समाजाने तरी यांच्याकडे आशेने का बघायचे? त्यामुळेच या अनुयायांचे निरुपद्रवीपण तेवढेच साऱ्यांच्या लक्षात राहिले.

मुळात सेवाग्रामची निर्मिती गांधींनी केलेली. त्यांच्या स्वप्नातले गाव अशीच आजही त्याची ओळख आहे. आज स्थिती काय तर या गावकऱ्यांचे व अनुयायांचे अजिबात पटत नाही. ज्यांचे गावाशीच वैर आहे ते देशभरात प्रेमभाव कसा काय निर्माण करू शकणार? आश्रम व सर्व सेवा संघाच्या ताब्यात असलेल्या जागा सांभाळणे, त्यांनी सुरू केलेले ग्रामोदयाशी संबंधित व्यवसाय कण्हत कुथत चालवणे, शेती सांभाळणे यालाच गांधीकार्य म्हणायचे असेल तर ते हे अनुयायी कसेबसे पार पाडत आहेत. खरे तर हे वारसा सांभाळण्याचे काम. मग विचारांच्या प्रसाराचे काय? तो कोण पुढे नेणार? त्याला कृतिशीलतेची जोड कुणी द्यायची? याची उत्तरे या अनुत्तीर्ण अनुयायांकडे नाहीत. त्यामुळेच त्यांच्यातील भांडणाकडे कुणी लक्षही द्यायला तयार नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीविरुद्धचा विखार समाजात वाढत जाण्याला जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण या अनुयायांच्या नाकर्तेपणात दडले आहे, हेही तेवढेच खरे!

devendra.gawande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:18 am

Web Title: controversy erupted in mahatma gandhi sevagram ashram zws 70
Next Stories
1 हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात 
2 वाघांच्या कृत्रिम स्थानांतरणासाठी अभ्यासगट
3 निवृत्त अधिकाऱ्यांसाठी नवीन पद निर्माण करून लक्षावधींचे वेतन!
Just Now!
X