इतर राज्यांसाठीही ‘मॉडेल’ उपयोगी

चंद्रशेखर बोबडे, नागपूर</strong>

शेजारच्या राज्यातील धरण भरल्यावर त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे दुसऱ्या राज्यात येणाऱ्या पुरावर व त्यामुळे होणाऱ्या हानीवर दोन्ही राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयातून उभारलेली यंत्रणा परिणामकारक ठरल्याचे चित्र पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्य़ात दिसून येते. हे मॉडेल राज्यातील इतर भागात किंवा इतर राज्यांसाठीही उपयोगी ठरू शकते, असा विश्वास ही यंत्रणा हाताळणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मध्यप्रदेशातून पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया  जिल्ह्य़ात वाहणाऱ्या वैनगंगा नदीला याच नदीवर मध्य प्रदेशात असलेल्या संजय सरोवरमधून पाणी सोडल्यावर पूर येत असे व हजारो हेक्टर शेतीला तसेच लाखो लोकांना पुराचा फटका बसत होता. २००५ मध्ये अशाच प्रकारे पूर आला होता व त्यामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती.

यावर नियंत्रणासाठी भंडारा जिल्ह्य़ाचे तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजी सरकुंडे  व  भंडारा लघु पाटंबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता शिरीष आपटे यांनी दोन्ही राज्यातील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची गरज व्यक्त केली. या अधिकाऱ्यांच्या पुढाकारातूनच बालाघाट, शिवनी आणि भंडारा व गोंदिया अशा चार जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी, पाटबंधारे आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठक २००८ मध्ये बालाघाट मध्ये झाली होती. या बैठकीत पूर येण्याची कारणे, पाण्याचा विसर्ग, नद्यांची स्थिती, पावसाचा आणि हवामानाचा अंदाज, दोन्ही राज्यातील संबंधित जिल्ह्य़ांची परिस्थिती यासह इतरही संबंधित मुद्यांवर चर्चा करून एक संयुक्त कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यांच्या अंमलबजावणीनंतर २००८ पासून आतापर्यंत  भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ात संजय सरोवरमधून पाण्याच्या विसर्गामुळे  पूरस्थिती उद्भवली नाही, असे ही यंत्रणा राबवण्यात मोलाची भूमिका बजावणारे तत्कालीन कार्यकारी अभियंता शिरीष आपटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

संजय सरोवरमधून पाणी केव्हा सोडायचे, याबाबत मध्यप्रदेशातील अधिकारी आमच्याशी चर्चा करत, वैनंगगेत पाणी कमी असेल तर आम्ही त्यांना पाणी सोडण्यास परवानगी देत असू. पाणी अधिक असेल तर थांबायला सांगितले जात असे. आवश्यकच असेल तर  पाणी कमी सोडले जायचे. त्यांच्या वेळा आम्ही निर्धारित केल्या होत्या. म.प्र.मधून रात्री पाणी सोडले तर ते गोंदिया जिल्ह्य़ात सकाळी तर भंडारा जिल्ह्य़ात सायंकाळपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे यावेळपर्यंत आम्ही यंत्रणेला सतर्क करीत होतो. यामुळे पूर नियंत्रण शक्य झाले, असे आपटे म्हणाले.

दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकांमध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचे आदान प्रदान करणे, ‘रिझव्‍‌र्ह वायर ऑपरेशन शेडय़ुल’(जलसाठय़ाच्या दैनंदिन नोंदी)मधील नोंदीचा अभ्यास करणे, भंडारा, गोंदियाच्या सीमेवरील देवरी येथील ‘सरिता मापन केंद्रा’तील (रिव्हर गेजिंग मॅपिंग) आलेखावरून पाणी पातळीचा अंदाज घेणे, म.प्र. तसेच भंडारा, गोंदिया भागातील पावसाचा अंदाज घेणे, अतिवृष्टीची शक्यता असेल तर विसर्ग न करणे या व इतरही उपायोजनांमुळे  २००८ ते २०१३  या काळात पूरनियंत्रण करणारी व्यवस्था तयार झाली. जी आजही  सुरू आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.