तरुणाई सातत्याने काहीतरी नवीन करण्याच्या मागे लागलेली असते आणि त्यातून निर्माण होणारी कलाकृतीही नवीनच असते. मग त्यासाठी मोठी शहरे, खूप मोठा पैसा, सोयीसुविधा असाव्यात असे नाही. मेहनत करायची तयारी असेल तर उपलब्ध परिस्थितीतूनही नाविन्याची निर्मिती करता येते. नागपुरातील तरुणाईने अशाच नाविन्यपूर्ण कलाकृतीची केलेली निर्मिती कौतुकाची थाप देऊन गेली आहे. त्यांनी चित्रीकरण केलेल्या दोन्ही गाण्यांच्या ध्वनीचित्रफीत सध्या ‘यू टय़ुब’वर तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत.

उपराजधानीतील म्हाळगीनगर, हुडकेश्वर परिसरातील काही तरुण मित्रमंडळी एकत्र आली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या व टीव्ही तसेच चित्रपट क्षेत्रात रस असणाऱ्या तरुणाईच्या गप्पांमधून आपणही एखादी अशी कलाकृती का निर्माण करू नये, यावर चर्चा रंगली. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही या निर्णयाप्रत ते पोहोचले आणि ‘कॉरकिंग एन्टर्टेन्मेंट’ उदयास आले. सुरुवातीला लहानमोठे कलात्मक उपक्रम त्यांनी राबवले. नंतर एक छोटासा प्रयोग म्हणून ‘ये राते’ ही पाच मिनिटांची ध्वनीचित्रफित त्यांनी तयार केली. एका गाण्याची ध्वनीचित्रफित तयार करणे एवढे सोपे नाही. त्यासाठी मोठमोठे कॅमेरा, स्थळ, पैसा, परवानगी या साऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत. त्यांच्याकडे एक छोटा एचडी कॅमेरा होता आणि त्या कॅमेऱ्याच्या बळावर त्यांनी चित्रीकरण केले. या ध्वनीचित्रफितीत काम करणारे कलावंतही त्यांच्यातलेच होते. त्यातील एका मित्राच्या घरावर त्यांनी स्वत:च एक सेट तयार केला आणि चित्रीकरण केले. तर उर्वरित चित्रण त्यांनी वाकी येथील दग्र्याजवळ असलेल्या नदी परिसरात, सेमिनरी हिल्स, अंबाझरी यासारख्या ठिकाणी केले. पाच दिवसात चित्रीकरण आणि पाच दिवसात त्या चित्रीकरणाचे संपादन करून तयार झालेली ध्वनीचित्रफित ‘यू टय़ुब’ वर टाकली. २०१५च्या दिवाळीत त्यांनी केलेला हा पहिला प्रयोग चांगलाच भाव खाऊन गेला. अवघ्या १५ ते २० हजारात त्यांची ही कलाकृती कुणाच्याही मदतीशिवाय तयार झाली.

आता त्यांची दुसरी ध्वनीचित्रफित ‘ए गर तेरी सोच तो परे’ ‘यू टय़ुब’ वर धुमाकूळ घालत आहे. तब्बल सात मिनिटांच्या या ध्वनीचित्रफितीने अवघ्या काही कालावधीतच अडीच हजाराहून अधिक लाइक्स मिळवले आहेत.

उन्हाळयाच्या सुटय़ांमध्ये त्यांची ही ध्वनीचित्रफित तयार झाली. पुण्याहून त्यांचे काही मित्र आले आणि त्यांनीही यात सहभाग घेतला. दोन्ही ध्वनीचित्रफितीनंतर आता त्यांच्या या चमूला इतरही निर्मात्यांकडून विचारणा होत आहे.

सुटय़ांचा सदुपयोग

अंकुश मोरे, तुषार सोनेवार, विशाल शर्मा, प्रियंका सोनेवार, संघरतन चौहान, सायली गोडे आदी महाविद्यालयीन तरुणाई ही मध्यमवर्गीय घरातीलच आहे. सुटय़ांमध्ये ते असे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या दोन प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर आता लघुपट बनवण्याच्या तयारीत ते आहेत. रितसर नोंदणीकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे महाविद्यालयीन तरुणाईवर ‘बिघडलेली’ असा ठप्पा ठेवला जात असतानाच, या तरुणाईने सुटय़ांचा केलेला सदुपयोग निश्चितच कौतुकास्पद आहे.