महेश बोकडे

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.  देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागासह इतर स्रोतांकडून माहिती गोळा करून वैद्यकीय शिक्षण खात्याने तयार केलेल्या अहवालात जगभऱ्यात ३१ मार्च २०२० पर्यंत करोनाचे ७ लाख ५० हजार ८९० रुग्ण आढळले. त्यात ३६ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ४.८४ टक्के आहे. जगाच्या तुलनेत भारतात १,४६३ करोनाग्रस्त आढळले. यापैकी उपचारादरम्यान ३८ जण दगावले. हे मृत्यूचे प्रमाण जगाच्या तुलनेत २ टक्के कमी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ३२० रुग्ण आढळले. पैकी उपचारादरम्यान १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात देशाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १ टक्यांनी अधिक आहे.

अहवालानुसार देशात १ फेब्रुवारी २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला. ३१ मार्च २०२० रोजी ही संख्या १,४६३ वर गेली. तर महाराष्ट्रात मार्च- २०२० च्या पहिल्या आठवडय़ात पहिल्या रुग्णाची नोंद झाली. ३१ मार्चपर्यंत ही संख्या ३२० वर पोहचली. जगातील इतर देशांच्या तुलनेत गुणाकार पद्धतीने रुग्ण वाढ रोखण्यात तुर्तास केंद्र व राज्य सरकारला आंशिक यश मिळाल्याचे अहवालात नमूद आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांत ३६ टक्के व्यक्तींनी प्रवास केल्याने तर २५ टक्के व्यक्ती करोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने त्यांना विषाणूची लागण झाली आहे. इतरांच्या इतिहासाची माहिती जाणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अहवालाला वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दुजोरा दिला आहे.

सर्वाधिक १६८ रुग्ण मुंबईत: सर्वाधिक १६८ रुग्ण मुंबईत: या अहवालानुसार, राज्यात ३१ मार्च २०२० पर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांत सर्वाधिक १६८ रुग्ण मुंबईत त्यानंतर पुणे ५०, ठाणे  ३६, सांगली २५, नागपूर १६, अहमदनगर ८, यवतमाळ ४, बुलढाणा येथे ३ रुग्ण आढळले. सातारा आणि कोल्हापूरला प्रत्येकी २, तर औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.