नियम झुगारत नागरिकांची गर्दी

नागपूर : ईडा पीडा, माशी मोंगशे, रोगराई घेऊन जा गे मारबत.. अशा घोषणेसह नागपुरात मंगळवारी तान्हा पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या ऐतिहासिक काळ्या व पिवळ्या मारबतीची मिरवणूक न काढता दहन करण्यात आले. मात्र, यावेळी सर्व करोना निर्बंध झुगारून इतवारी भागातील नेहरू चौक आणि जगनाथ बुधवारी परिसरात चांगलीच गर्दी उसळली. ही गर्दी करोनाचे संकट वाढवणारी तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो लोकांच्या गर्दीवर महापालिका व पोलीस प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नव्हते.

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने दरवर्षी तान्हा पोळ्याला काळ्या, पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. करोनामुळे  मागील वर्षी आणि यंदा मारबतीच्या मिरवणुकीला प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे काळ्या आणि पिवळ्या मारबतीच्या मिरवणुकींची परंपरेत गेल्या १३८ वर्षांत प्रथमच यावर्षी खंड पडला. तरीही मंगळवारी नेहरू चौक परिसरात काळ्या मारबतच्या दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी उसळल्याचे चित्र होते. पोलिसांनी मिरवणुकीची परवानगी नाकारली असली तरी परंपरा जपण्यासाठी नेहरू चौका जवळच्या मैदानात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काळ्या मारबतीच्या दहनाची परवानगी दिलेली होती. सकाळी पूजेनंतर काळी मारबत दहनासाठी नेत असताना मोठय़ा संख्येने लोक दर्शनासाठी नेहरू चौकात गोळा झाले होते. बहुतांश लोकांनी मुखपट्टी घातलेली नव्हती. काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे दर्शन केल्याने अरिष्ट टळतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षीच मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, शिवाजी पुतळा या मार्गावर मिरवणूक निघताच रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होते. यंदा त्या तुलनेत गर्दी झाली नसली तरी करोनाचा धोका वाढेल एवढी गर्दी नेहरू चौक परिसरात झाली होती. जगनाथ बुधवारी परिसरातून निघालेल्या पिवळ्या मारबतीचे नाईक तलावाशेजारी दहन करण्यात आले. तिथेही लोकांनी मोठय़ा प्रमाणात करोनाचे नियम तुडवत गर्दी केली होती.