सर्वाधिक मृत्यू आस्था क्रिटिकल केअरमध्ये

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : जिल्ह्य़ातील शासकीय व खासगी रुग्णालये, वसतिगृह, विविध गाळ्यांमध्ये ११५ कोविड रुग्णालये व कोविड केअर सेंटर आहेत. यापैकी ५६ रुग्णालयांत एकही रुग्ण नाही. ८ रुग्णालयांत १४ फेब्रुवारीपर्यंत करोनाचा मृत्यूदर १५ टक्क्यांहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने या मुद्यावर नागपूर महापालिकेतील आरोग्य विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाचे कान टोचले. त्यानंतरही या कोविड रुग्णालयाबाबत प्रशासनाचे काहीही निर्णय न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या १४ फेब्रुवारीच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्य़ातील ५६ कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये एकही करोनाबाधित नव्हता.  मेडिकल, मेयो या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालये मिळून येथील एकूण ८ रुग्णालयांत आजपर्यंत दाखल बाधितांपैकी १५ टक्क्यांहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले.

ार्वाधिक २४ टक्के मृत्यू आस्था क्रिटिकल केअर रुग्णालयात तर १८.३३ टक्के मृत्यू एलएमसी रुग्णालय (हिंगणा), १८.३३ टक्के मृत्यू मेडिकल, १५.९२ टक्के मृत्यू मेयो रुग्णालयात झाले.

खासगी रुग्णालयांतून शेवटच्या क्षणी मेडिकल- मेयोत रुग्ण आल्याने येथील मृत्यूदर जास्त आहे. ३ रुग्णालयांत १० ते १४ टक्के, १२ रुग्णालयांत ७ ते ९ टक्के, २० रुग्णालयांत ४ ते ६ टक्के मृत्यूदर आहे. केंद्रीय पथकातील इंटिग्रेटेड डिसिज सव्‍‌र्हिलन्स कार्यक्रमाचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंग, उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी आणि  डॉ. रजनीश कौशिक यांनी ८ फेब्रुवारीच्या निरीक्षणात या गंभीर बाबींवर बोट ठेवले. एवढा मृत्यूदर  शक्य नसल्याने तेथील व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी महापालिका आणि आरोग्य खात्याला गांभीर्याने चौकशीची सूचना केली. यापैकी दोष असलेल्यांसह एकही रुग्ण नसलेल्या खासगी रुग्णालयांचा कोविड रुग्णालयांचा दर्जा काढण्यास हरकत नसल्याचेही सांगितले.

हे पथक परतून एक आठवडा झाल्यावरही अद्याप या रुग्णालयांबाबत काहीही कारवाई झाली नाही. या विषयावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. संजय चिलकर यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

मेडिकल, मेयोत सर्वाधिक रुग्णांवर उपचार

जिल्ह्य़ात १४ फेब्रुवारीपर्यंत करोनाचे एकूण १ लाख ३८ हजार ७५५ रुग्ण आढळले. त्यातील १ लाख १० हजार ४९५ रुग्ण शहर, २७ हजार ३५२ रुग्ण ग्रामीण तर ९०८ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. शहरातील रुग्णांपैकी २,७४८, ग्रामीण ७५६, जिल्ह्य़ाबाहेरील ७२६ असे एकूण ४,२३० रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात १ लाख ४ हजार ४६४, ग्रामीण २६,०१४ असे एकूण १ लाख ३० हजार ४७८ व्यक्ती करोनामुक्त झाले. शहरात सध्या ३,२८६, ग्रामीण ७६१ असे एकूण ४,०४७ सक्रिय  रुग्ण आहेत.  शहरात आजपर्यंत सर्वाधिक ८,८१९ रुग्ण मेयोत, ८,६३६ रुग्ण मेडिकलमध्ये तर एम्समध्ये १,२१२ रुग्ण दाखल झाले. याशिवाय  सात खासगी रुग्णालयांमध्ये आजपर्यंत एकही रुग्ण दाखल झाला नसल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

‘‘केंद्रीय पथकाच्या सूचनेप्रमाणे करोनाचा मृत्यूदर जास्त असलेल्या खासगी रुग्णालयांतील मृत्यूच्या अंकेक्षणाबाबत महापालिका पातळीवर कारवाई सुरू असावी. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. रुग्ण नसलेल्या रुग्णालयांनी कोविड रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी संबंधित यंत्रणेला अर्ज केल्यावरच त्याबाबत कारवाई होईल.’’

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक व कोविडचे नोडल अधिकारी.