जिल्ह्य़ाबाहेरील ५९ मृत्यूंमुळे प्रमाण अधिक

नागपूर :  शहर व ग्रामीण भागात गेल्या महिन्याभरापासून २४ तासांत आढळणाऱ्या नवीन करोनाग्रस्त रुग्णांसह मृत्यूची आकडेवारी बघता हा आजार नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. परंतु १ जून ते १३ जुलै २०२१ दरम्यान ४२ दिवसांमधील नवीन बाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण तब्बल ४.८३ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून पुढे आले आहे. जिल्ह्य़ाबाहेरील ५९ मृत्यूंमुळे प्रमाण अधिक दिसत असले तरी शहरातही तब्बल ३.३५ टक्के मृत्यू नोंदवले गेले आहेत.

नागपूर शहरात १ जून २०२१ ते १३ जुलै २०२१  या ४२ दिवसांमध्ये करोनाचे १ हजार ६६९, ग्रामीणला १ हजार ४१, जिल्ह्य़ाबाहेरील ५९ असे एकूण जिल्ह्य़ात २ हजार ७६९ नवीन रुग्ण आढळले. या काळात शहरात ५६ रुग्ण, ग्रामीणला १९, जिल्ह्य़ाबाहेरील ५९ अशा एकूण १३४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्य़ात नवीन रुग्णांच्या तुलनेत तब्बल ४.८३ टक्के मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यात शहरातील रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.३५ टक्के, ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के तर जिल्ह्य़ाबाहेरील येथे उपचाराला आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १०० टक्के नोंदवले गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी शहरी भागातील मृत्यूचे प्रमाण मात्र आणखी कमी करण्यासाठी जास्त प्रयत्नांची गरज आहे. दरम्यान, नागपूरच्या शहरी भागात मार्च- २०२० ते १३ जुलै २०२१ पर्यंत करोनाचे ३ लाख ३२ हजार ७२५, ग्रामीणला १ लाख ४३ हजार ३७, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ६१२ असे एकूण  ४ लाख ७७ हजार ३७४ रुग्ण आढळले. त्यातील शहरात ५ हजार २९९ रुग्ण (१.५९ टक्के), ग्रामीणला २ हजार ३०७ (१.६१ टक्के), जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४३० रुग्ण (८८.७० टक्के) असे जिल्ह्य़ात ९ हजार ३६ रुग्णांचा (१.८९ टक्के) मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या ४३ दिवसांत जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या खूप कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढलेले दिसत आहे. या आकडेवारीला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.