लष्कर तैनात  होणार असल्याची अफवा परसरवली

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याचे सर्वदूर प्रयत्न सुरू असताना उपराजधानीत अफवांचा बाजारही तेज आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारा वेगवेगळे संदेश फिरत असून एकाने शहरातील आठ भाग अनियंत्रित असल्याने त्या ठिकाणी लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात संचारबदी लागू आहे. त्यानंतरही मोमीनपुरा, शांतीनगर, पिवळीनदी, जाफरनगर, गांधीबाग, ताजबाग, कामठी व हसनबाग आदी भागातील जनता रस्त्यावर फिरत असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. या भागांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात येणार असून, ते विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज व रबरी गोळ्या झाडतील, असा मजकूर या मॅसेजमध्ये होता. एका मोबाईलधारकाने हा मॅसेज पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवला. पोलीस नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक श्रावण बागुल यांनी सदर पोलिसांत तक्रार दिली. सदर पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व आदेशाची अवहेलना केल्याचा गुन्हा दाखल केला.