प्रशासनाला आता नवीन रुग्णाची प्रतीक्षा

नागपूर :  मेडिकल  येथील उपचारासाठी निवडलेल्या करोनाबाधितानेच ऐन वेळेवर रक्तद्रव्य उपचारासाठी (प्लाझ्मा थेरपी) नकार दिल्याने शहरातील पहिल्या रक्तद्रव्य उपचाराचा मुहूर्त अखेर टळला. त्यामुळे  प्रशासनाला आता नवीन रुग्णाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यातील सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत रक्तद्रव्य उपचाराच्या वैद्यकीय चाचणी प्रकल्पाचे उद्घाटन २९ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलला सोपवण्यात आली आहे. मेडिकलच्या चमूनेही सोमवारी दोन करोनामुक्त झालेल्यांचे समुपदेशन करून त्यांचे रक्तद्रव्य मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान, येथील एका अमरावतीच्या डॉक्टर असलेल्या करोनाबाधिताला रक्तद्रव्य चाचणीसाठी राजी करण्यात आले होते. त्याच्या काही तपासण्याही करण्यात आल्या. या रुग्णाला मंगळवारी रक्तद्रव्य उपचाराचे निश्चित झाले. दरम्यान, रुग्णात मंगळवारच्या चाचणीत सकारात्मक बदल दिसल्याने तो बरा होत असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे वेळेवर रुग्णाने रक्तद्रव्य उपचारास  नकार दिला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर निर्णय स्थगित करावा लागला. सध्या मेडिकलमध्ये तिघांचे रक्तद्रव्य संग्रही आहे. मेयोतही एकाचे रक्तद्रव्य संग्रही आहे. या रक्तद्रव्याशी समरूप रुग्णांनाच ते देणे शक्य आहे. या विषयावर मेडिकलच्या प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  लवकरच नवीन रुग्ण मिळण्याची आशा व्यक्त केली.

द्रव्याचे वर्षभर संग्रह शक्य

मेडिकलमध्ये उपलब्ध झालेल्या तीन तर मेयोत उपलब्ध झालेल्या एक अशा चारही रक्तद्रव्याचे सुमारे वर्षभर विशिष्ट तापमानात काळजीपूर्वक ठेवून संग्रह करणे शक्य आहे. या एक वर्षांच्या कालावधीत ते या द्रव्याशी समरूप असलेल्या व्यक्तीला देता येते. या रक्तद्रव्यातून करोना विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती करोनाबाधितात निर्माण होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.