दोन मृत्यू; नवीन १७२ बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या साडेतीन हजारांच्या उंबरठय़ावर

नागपूर :  मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये दिवसभरात आणखी दोन  करोनाबाधितांचा मृत्यू झाला. याशिवाय तब्बल १७२ नवीन करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे शहरातील  एकूण बाधितांची संख्या साडेतीन हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे.

मेयो रुग्णालयात दगावलेला ६६ वर्षांचा पुरुष मूळ कामठीचा होता. त्याला करोनाशी संबंधित लक्षणे असल्याचे बघत १६ जुलैला  दाखल करण्यात आले होते. त्याला मूत्रपिंड, फुफ्फुस, मधुमेहाचाही त्रास होता. उपचारादरम्यान त्याचा आज २३ जुलैला सकाळी  मृत्यू झाला.  बाबुलखेडा येथील एका महिलेला २२ जुलैला अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे चाचणीत तिला करोना असल्याचे निदान झाले. तिचाही आज मृत्यू झाला. या दोन्ही नवीन मृत्यूंमुळे शहरातील आजपर्यंत करोनाने दगावलेल्यांची संख्या ६५ वर पोहचली आहे.

दरम्यान, शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सतत नवीन ७० ते १२५ च्या संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत होते. परंतु गुरुवारी तब्बल नवीन १७५ बाधित आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाकडून या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचण्यात प्रशासनाला आवश्यकतेच्या तुलनेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रचंड दमछाक सहन करावी लागत आहे.  बऱ्याच बाधितांना दाखल करण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याच्याही तक्रारी आहेत.

हिंगणा मार्गावर नवीन कोविड केअर सेंटर

आमदार निवासातील कोविड केअर सेंटर पूर्ण भरले आहे. तिकडे लक्षणे नसलेले रुग्ण  मेडिकल, मेयोत दाखल  आहेत. त्यामुळे  अत्यवस्थ संवर्गातील रुग्णांना उपचारासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार लोकसत्ताने पुढे आणल्यावर प्रशासनाने प्रथमच रात्री हिंगणा मार्गावरील शालिनीताई मेघे रुग्णालयात नवीन कोविड केअर सेंटर तयार करून तेथे काही रुग्ण पाठवले.

दहा तास चिमुकला ताटकळत

वाढत्या करोना बाधितांमुळे शासकीय रुग्णालयातील व्यवस्थापन बिघडले आहे. १३ वर्षांचा करोनाबाधित मुलगा जो आजारी आहे, त्याची खरे तर आजारामुळे सर्जरी होणार होती, त्याला घरून नेण्यासाठी बुधवारी ११ वाजता रुग्णवाहिका आली. पण अवघ्या काही अंतरावर असलेल्या रुग्णालयामध्ये दाखल होईपर्यंत या लहान मुलाला बेड उपलब्ध नसल्यामुळे चक्क १० तास रुग्णवाहिकेमध्ये ताटकळत बसावे लागल्याचे मुलाचे नातेवाईक शशांक गट्टेवार यांनी सांगितले.

सक्रिय रुग्णांची संख्या १,१८८ 

सक्रिय रुग्णांची संख्या गुरुवारी सायंकाळपर्यंत १,१८८ वर पोहचली आहे. यापैकी २७३ रुग्ण मेयोत, ३३५ रुग्ण मेडिकलला, ४१ रुग्ण एम्समध्ये, १३ रुग्ण कामठीत, ४० रुग्ण खासगीत, ३५४ रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये, ६० रुग्ण मध्यवर्ती कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रात्री ७२ जणांवर रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नवे १५ परिसर प्रतिबंधित

करोनाबाधित आढळल्याने गुरुवारी पंधरा परिसर प्रतिबंधित करण्यात आलेत, तर दहा परिसर मुक्त करण्यात आले असून दोन प्रतिबंधित परिसरांची व्याप्ती कमी करण्यात आली. नव्या प्रतिबंधित क्षेत्रांत मंगळवारी झोन अंतर्गत अवस्थीनगर, सादिकाबाद रोड, आशीनगर झोन अंतर्गत गुरु तेग बहादूरनगर, याच झोन अंतर्गत हिमांशू अपर्टमेंट, कुऱ्हाडकर पेठ, पाचपावली, नवा नकाशा गल्ली क्रमांक १, व्ही.एच.बी. कॉलनी बाळाभाऊ पेठ, लकडगंज झोनअंतर्गत दिनबंधू सोसायटी भवानीनगर, याच झोन अंतर्गत दळवी रुग्णालय, गोकुल डेअरी जवळील, भरतनगर, हनुमान मंदिर, गांधी झोन महाल अंतर्गत जोग गल्ली, हेडगेवार निवासाजवळ हमालपुरा ठाकरे वाडा, लाल इमली चौक, श्रीधर अपार्टमेंट, राममंदिर गल्ली आणि धरमपेठ झोन अंतर्गत रचना सायनतारा फेज-२ बी विंग या परिसरांचा समावेश आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत नाईक तलाव-बैरागीपुरा व लकडगंज झोन अंतर्गत गांधीकुटी सोसायटी, भवानीनगर प्रतिबंधित परिसरांची व्याप्ती कमी करण्यात आली.