मुखपट्टी व सामाजिक अंतराचा विसर; तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

नागपूर : करोना रुग्णसंख्या कमी होताच शहरात र्निबधात शिथिलता देण्यात आल्यानंतर व्यापारी प्रतिष्ठानासह जवळपास सर्वच व्यवहार सुरू झालेत. यामुळे विविध भागात वर्दळीच्या रस्त्यावर छोटय़ा दुकानदारांनी दुकाने थाटल्यामुळे लोकांची गर्दी वाढत आहे. या गर्दीत करोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता बघता आणखी करोनाचा धोका वाढू शकतो. परिणामी, प्रशासनाने रस्त्यावरील छोटय़ा विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करत गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक व महापालिका सदस्यांकडून होत आहे.

करोनाबाधितांची संख्या कमी होत असून महापालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या जवळपास सर्वच व्यवहार सुरू झाले असून रात्री उशिरापर्यंत लोकांची बाजारात आणि विविध सार्वजानिक ठिकाणी वर्दळ  दिसते. पण बहुतांश लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. शहरातील उद्याने आणि मैदानांमध्ये फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून ९० टक्के लोक मुखपट्टी लावत नाही. सामाजिक अंतर पाळत नाहीत. अनेक लोक फिरताना थुंकतात तर काही तर उद्यानात खाण्याचे पदार्थ आणून तेथेच टाकून देतात. रेशीमबाग मैदानालगतच्या फुटपाथवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढल्याने या भागात गर्दी होत आहे. मैदानाच्या एका भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. त्याचा त्रास खेळाडूंना होत आहे. बाजारातही तीच स्थिती आहे.

महालातील बुधवार बाजार, सक्करदरा बाजार, गोकुळपेठ, जयताळा. पारडी, इतवारीसह संत्रा मार्केट येथील फळ बाजार व कॉटेन मार्केट येथेही अनेक लोक करोना संपला अशा अविर्भावात बिनधास्त फिरत नियमांचे पालन करत नाही. रस्त्यावर फळ विक्रेते किंवा खाद्यपदार्थाची विक्री करणारे लोक मुखपट्टी लावत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडे सायंकाळी खवय्याची गर्दी होते. तेथेही नियमांचे पालन होत नाही.

करोनाच्या काळात बंद असलेले भाजी बाजार आता सुरू झाले आहेत. पण विक्रेते व नागरिकांकडून दुकानात व इतरत्र सामाजिक अंतर पाळले जात नाही. यामुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहे. वर्धा रोड, नंदनवन, गोकुळपेठ, सक्करदरा, खामला, गांधीबाग, वर्धमाननगर, इतवारी, महाल, मंगळवारी, सदर, या परिसरात भाजी विक्रेते, फळविक्रेते रस्त्यावर हातगाडय़ा घेऊन उभे असतात. तेथे पोलीस आणि उपद्रवी शोध पथक फिरते. पण कारवाई केली जात नाही.  सध्या करोना रुग्णांची संख्या कमी असली तरी ती वाढू नये यासाठी आता महापालिका, पोलीस यंत्रणेने वेळीच यावर नियंत्रण आणावे. अन्यथा येत्या दिवसात मार्च-एप्रिल सारखी स्थिती शहरात निर्माण होईल. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण पुन्हा वाढेल.