चांदीही ७२ हजार रुपयांवर पोहोचली

नागपूर : करोनाकाळातही सोन्याची झळाळी कायम आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम हातातून गेल्यावरही सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. तर चांदी ७२ हजारावर गेली आहे. महागाई वाढत असल्याचा प्रभाव आता सराफा बाजारातही दिसू लागला आहे.

करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लग्नाचा हंगाम सराफा व्यापाऱ्यांच्या हातून गेला. करोना काळात नागरिकांची जीवनावश्यक वस्तू वगळता इतर खर्च करण्याएवढी क्रयशक्ती नव्हती. आता टाळेबंदी शिथिल झाली असली तरी सराफा बाजारात शांतता आहे. त्याचे मुख्य कारण सोन्या-चांदीचे वाढते भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सध्या बाजारात सोने ४९ हजार ६०० प्रति दहा ग्रॅम झाले आहे. तर चांदी ७२ हजार रुपये प्रतिकिलो झाली आहे. गेल्यावर्षी टाळेबंदीनंतर बाजारपेठ उघडली तेव्हाही सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्यावेळी सोने ५८  हजार तर चांदी ७४ हजारावर गेली होती. यंदा टाळेबंदी उठली तेव्हा सोने ४६ हजार प्रति दहा ग्रॅम तर चांदी ५० हजार प्रतिकिलो होती. मात्र त्यात वृद्धी होत आता सोन्याचे दर पन्नास हजाराच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सराफा बाजारात सध्या खरेदी मर्यादित होत असून व्यापाऱ्यांच्या मते आता पुढील लग्नाचा हंगाम हिवाळ्यात आहे. तेव्हापर्यंत सोन्याचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेले दोन वर्षे आमचा मुख्य हंगाम हा टाळेबंदीत गेला आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील हंगामात काही प्रमाणात व्यवसाय होईल अशी आशा आहे. मात्र झालेले नुकसान भरून निघण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल.