खासगी प्रयोगशाळेवर कारवाईचाही फटका

नागपूर : महापालिकेच्या करोना चाचणी केंद्रांवर मनुष्यबळ आणि इतर साधनांअभावी चाचण्यांची संख्या घटली आहे. दुसरीकडे  रामदास पेठेतील एका खासगी चाचणी केंद्रावर महापालिकेने कारवाई  केल्याने ते बंद आहे. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रावर न जाणाऱ्यांसाठी आता  करोना चाचणीसाठी मर्यादितच पर्याय शिल्लक उरले आहेत.

नागपुरात करोनाची साथ वाढल्यावर महापालिकेने शहरातील विविध भागात ५० पेक्षा अधिक ठिकाणी करोना चाचणी केंद्र सुरू केले.  पाच ते सहा हजार चाचण्या दररोज  केल्या जात होत्या. परंतु मधल्या काळात महापालिकेची यंत्रणा ढेपाळली, ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण घटले. सोमवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, फक्त २,६७२ चाचण्या करण्यात आल्या. यासंदर्भात महापालिकेतून माहिती घेतली असता केंद्रावरील साधनांचा अभाव आणि रविवारी बंद असलेले काही केंद्र  यामुळे चाचण्या घटल्याचे कळले.

साधारणपणे एका चाचणी केंद्रावर रोज १०० ते २०० लोक  येतात. यापैकी काही केंद्रावर निम्म्यांचीच चाचणी केली जाते. काही ठिकाणी किट्स संपलेल्या असतात तर काही ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्याने नागरिकांना परत पाठवले जाते.  महापालिकेचे सध्या ५० केंद्र आहे. यापैकी रविवारी १८ ते २० केंद्र मनुष्यबळ नसल्याने बंद ठेवली जातात.

मधल्या काळात साथ जोरात असल्याने रविवारीही पूर्ण क्षमतेने केंद्र सुरू ठेवले जात होती. पण आता पुन्हा  जैसे—थे स्थिती असल्याने शहरात चाचण्यांची संख्या कमी झाली आहे.  रामदासपेठेतील ध्रुव मध्ये लोकांची  गर्दी होत होती. मात्र प्रयोगशाळेतील अनियमिततेमुळे महापालिकेने  कारवाई केली. त्या क्षमतेने चालणारी  दुसरी प्रयोगशाळा शहरात नाही. त्यामुळेही चाचण्यांची संख्या कमी झाली आहे.

महापालिकेच्या  केंद्रावर तपासणी साधनांची कमतरता असल्यामुळे चाचणीचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु आता सर्वच केंद्रांवर मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे चाचणीचे प्रमाण वाढेल.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त.