पती ९९ तर पत्नी ८७ वर्षीय; जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली

नागपूर : एकीकडे लसीकरणाबाबत काही व्यक्ती समाजमाध्यमांवर विविध प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु दुसरीकडे वृद्ध व्यक्तींचे लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. रविवारी मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर ९९ वर्षीय पती व ८७ वर्षीय पत्नीने लसीकरण करून घेतले. दरम्यान, येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत केंद्राच्या निरीक्षणासाठी पोहचल्याने त्यांनी या दाम्पत्याशी संवादही साधला.

कृष्णराव दळवी (९९) आणि अनुराधा दळवी (८७) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. दोघांनीही लस घेण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर त्यांना लसीकरणासाठी त्यांचे नातेवाईक प्रा. डॉ. उदय नारलावार मेडिकलच्या लसीकरण केंद्रात घेऊन आले होते. येथे आल्यावर दोघांनी प्रथम त्यांच्या आधार कार्डच्या मदतीने नोंदणी केली. त्यानंतर दोघांना काही वेळ प्रतीक्षा केल्यावर त्यांचा क्रमांक आल्यावर लस दिली गेली. दरम्यान, अचानक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. हे अचानक लसीकरण केंद्रावर निरीक्षणासाठी पोहचले.

ही माहिती कळल्यावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे तेथे आले. पालकमंत्र्यांनी लसीकरण केंद्राच्या विविध प्रक्रिया होणाऱ्या भागाला भेट देत येथील कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांशी संवाद साधला. येथे दळवी हे वृद्ध दाम्पत्य भेटल्यावर त्यांनी दोघांशीही संवाद साधला. दरम्यान, केंद्रावर त्यांनी लसीकरणाला येणाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याची सूचना मेडिकल प्रशासनाला केली. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी केंद्रासह मेडिकलमधील काही प्रश्न सांगत ते सोडवण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. तातडीने ते सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांकडून दिले गेले. त्यातच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रसंगी त्यांच्या लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली. त्यामुळे ते पालकमंत्र्यांसोबत पुढच्या दौऱ्यावर न जाता येथेच नियमानुसार अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कार्यालयात ३० मिनिटे बसले.