नागपूर विभागात पुन्हा १.२८ लाख लसींच्या कुप्या

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : केंद्र सरकारने लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर विभागातही लसींचा पुरवठा वाढवला आहे. २ मार्चला विभागातील सहा जिल्ह्य़ांसाठी ऑक्सफर्डची कोविशिल्डच्या ९७ हजार ९०० कुप्या, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या ३० हजार ९०० कुप्या अशा एकूण १ लाख २८ हजार ८०० कुप्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पोहचल्या आहेत. पहिल्या पुरवठय़ानंतर लसींचा दुसरा पुरवठा ३६ दिवसांनी तर दुसऱ्या पुरवठय़ानंतर लसींचा तिसरा पुरवठा केवळ १७ दिवसांनी झाला.

केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांपासून करोना प्रतिबंधित लसीकरणाला सुरुवात केली होती. त्यासाठी नागपूर विभागात १४ जानेवारीला सहा जिल्ह्य़ांसाठी १.२० लाखांच्या जवळपास कोविशिल्ड तर २ हजारच्या जवळपास कोव्हॅक्सिन लसींच्या कुप्यांचा पुरवठा झाला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणात पहिल्या फळीतील गृह, महसूल, गृहनिर्माण विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. त्यापूर्वी केंद्र सरकारकडून पहिल्या पुरवठय़ानंतर ३६ दिवसांनी १३ फेब्रुवारीला विभागात १ लाख २० हजार १०० कोविशिल्ड, २१ हजार ३०० कोव्हॅक्सिन असा १ लाख ४१ हजार ३०० कुप्यांचा पुरवठा केला.

१ मार्चपासून केंद्र सरकारने ६० वर्षांवरील वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, मेंदूरोगासह दहा वर्षे मधुमेह व इतरही आजाराच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केले. या गटातील व्यक्तींकडून लसीकरणाला प्रतिसादही सर्वाधिक मिळत आहे. त्यामुळे आता लसीकरण वाढवण्यासाठी दुसऱ्या लस पुरवठय़ाहून केवळ १७ दिवसांत २ मार्चला नागपूर विभागासाठी कोविशिल्डच्या ९७ हजार ९००, कोव्हॅक्सिनच्या ३० हजार ९०० अशा एकूण १ लाख २८ हजार ८०० कुप्यांचा पुरवठा वाढला आहे. तिन्ही पुरवठय़ाची खेप बघता आता स्वदेशी भारत बायोटेक कंपनीकडील लसींचा पुरवठा वाढत असल्याचे दिसत आहे. एका कुपीत दहा जणांचे लसीकरण होईल एवढी मात्रा असते, हे विशेष. २ मार्चला उपलब्ध झालेल्या लसींच्या वत्ताला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.